घरक्रीडापहिल्या कसोटीत भारताची दादागिरी

पहिल्या कसोटीत भारताची दादागिरी

Subscribe

पाहुण्या आफ्रिकेवर २०३ धावांनी मात

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय साकारला. दुसर्‍या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या आफ्रिकन संघाला भारतीय फलंदाजांनी ठराविक अंतराने माघारी पाठवले. भारताकडून मोहम्मद शमीने ५, रविंद्र जाडेजाने ४, तर अश्विनने १ बळी घेतला. त्यामुळे आफ्रिकेचा संघ दुसर्‍या डावात केवळ १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला.

रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर ३९५ धावांचे आव्हान दिले. भारताने चौथ्या दिवशी, आफ्रिकेचा पहिल्या डावातील शतकवीर डीन एल्गरला झटपट माघारी धाडले. रविंद्र जाडेजाने एल्गरला पायचीत पकडत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍यासमोर आफिकेचे फलंदाज तग धरूच शकले नाहीत. नाईट वॉचमन डे-ब्रूनला माघारी धाडत अश्विनने अखेरच्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर मोहम्मद शमीने बावुमाचा शून्यावर त्रिफळा उडवला.

- Advertisement -

कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि एडन मार्क्रम यांनी आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद शमीने कर्णधार डु-प्लेसिसचा त्रिफळा उडवला. यानंतर क्विंटन डी-कॉक, मार्क्रम, फिलँडर, केशव महाराज हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. उपहारानंतरही पिडीटने नेटाने फलंदाजी करत आपले अर्धशतक झळकावले. नवव्या विकेटसाठी पिडीट आणि मुथुस्वामी यांनी ९१ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना झुंजवले. अखेरीस मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पिडीटच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर जाऊन आदळला आणि आफ्रिकेची जमलेली जोडी फुटली. यानंतर रबाडाला यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या हातून झेलबाद करत शमीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

धावफलक                                                                                                                    भारत 502/7 घोषित & 323/4 घोषित. दक्षिण आफ्रिका 431 (131.2) & 191 (63.5)

- Advertisement -

शमी दिग्गजांच्या पंक्तीत

मोहम्मद शमीने दुसर्‍या डावात ५ फलंदाजांना माघारी धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या ५ फलंदाजांपैकी ४ फलंदाज हे त्रिफळाचीत होऊन माघारी परतले आहेत. या कामगिरीसह मोहम्मद शमीला दिग्गज भारतीय गोलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसर्‍या डावात ५ बळी घेणारा मोहम्मद शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

भारताचे अव्वल स्थान कायम

विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ १६० गुणांसह अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झाला आहे. भारताच्या खालोखाल न्यूझीलंड आणि श्रीलंका ६० गुणांसह अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -