घरक्रीडाभारताने सलग चौथ्यांदा जिंकली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, चौथा कसोटी सामना अनिर्णित

भारताने सलग चौथ्यांदा जिंकली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, चौथा कसोटी सामना अनिर्णित

Subscribe

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला आहे. भारताने अशाप्रकारे २-१ कसोटी मालिका जिंकत सलग चौथ्यांदा बॉर्डर गावसकर ट्रॉफी आपल्या जवळ ठेवली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव चौथ्या दिवशी 571 धावांवर आटोपला. त्यानंतर पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने सामना संपेपर्यंत 2 बाद 175 धावा केल्या. यानंतर दोन्ही कर्णधारांनी सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

भारतात १५ महिन्यांनंतर कसोटी अनिर्णित राहिली आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळला गेलेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने १२ कसोटी सामने खेळले असून त्यातील एकच सामना अनिर्णित राहिला होता. यादरम्यान भारतीय संघाने आठ कसोटी सामने जिंकल्या आहेत, तर तीनमध्ये पराभवाचा सामना केला आहे. भारताने बॉर्डर गावसकर ही कसोटी मालिका 2-1 ने आपल्या नावे केली.

भारताने नागपुरातील पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी आणि दुसरी कसोटी सहा विकेट्सने जिंकली होती. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे चौथी कसोटी दोन्ही संघासाठी महत्त्वाची होती. परंतु चौथी कसोटी अनिर्णित राखण्यात भारतीय संघाला यश आले. अशाप्रकारे भारताने २-१ ने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्या नावे केली.

- Advertisement -

सलग चौथ्यांदा बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताकडे
यावर्षी बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकण्यासोबतच भारतीय संघाने इतिहासही रचला आहे. भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जवळपास २६ वर्षांपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका खेळली जात आहे, मात्र सलग चौथ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दिल्ली कसोटी जिंकताच भारताने ऑस्ट्रेलियावर २-० अशी आघाडी घेतली होती. त्याचबरोबर चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका गमावण्याच्या संघाच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या होत्या. मालिकेतील पुढील दोन सामने अनिर्णित राहिले असते तरी बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताकडे कायम राहिली असती. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 1996 मध्ये सुरू झाली, तेव्हापासून दोन संघांपैकी केवळ भारतानेच सलग चार वेळा ट्रॉफी जिंकली आहे. 1996 पूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका या नावाने खेळली जात होती.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 16 बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका खेळल्या आहेत. यापैकी 11 वेळा भारतीय संघाने ही ट्रॉफी ताब्यात घेतली आहे. भारताने ही ट्रॉफी 1996/97, 1997/98, 2000/01, 2003/04, 2008/09, 2010/11, 2012/13, 2016/17, 2018/19, 2020/21/23 मध्ये जिंकली आहे, तर ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी पाच वेळा जिंकली आहे. त्यांनी ही ट्रॉफी 1999/00, 2004/05, 2007/08, 2011/12, 2014/15 मध्ये जिंकली आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण २८ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 12 आणि भारतीय संघाने 11 मालिका जिंकल्या आहेत, तर पाच मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -