घरक्रीडाक्रिकेट योग्य दिशेने जातंय का,याचा विचार करण्याची हीच वेळ!

क्रिकेट योग्य दिशेने जातंय का,याचा विचार करण्याची हीच वेळ!

Subscribe

मायकल होल्डिंगचे मत

आर्थिक फायद्यासाठी आता अमर्याद क्रिकेट होत असून हा खेळ खरेच योग्य दिशेने जात आहे का, याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे, असे मत वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंगने व्यक्त केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. मागील काही काळात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटसह जगभरात टी-१०, द हंड्रेड (१००-१०० चेंडूचे सामने) असे क्रिकेटचे विविध प्रकार सुरु आहेत. त्याआधीच विविध देशांमध्ये टी-२० स्पर्धा होत आहेत. त्यामुळे क्रिकेटला आणि क्रिकेटपटूंना या विश्रांतीची गरजच होती असे होल्डिंग यांना वाटते.

ही विश्रांती कुठेतरी गरजेचीच होती. आता या वेळेचा उपयोग प्रशासक आणि खेळाडूंबाबत काय होत आहे याचा विचार करण्यासाठी केला पाहिजे. क्रिकेट योग्य दिशेने जात आहे का? आपल्या खेळात सर्व योग्य पद्धतीने होत आहे का? याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. माझ्या मते हा खेळ योग्य दिशेने जात नाहीये. प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. प्रत्येकच जण आर्थिक फायद्याचा विचार करत आहे. मात्र, आपण आता जरा थांबून, सगळे योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार झाला पाहिजे. सध्या जरा जास्तच क्रिकेट खेळले जात आहे, असे होल्डिंग म्हणाले.

- Advertisement -

सध्या सर्व क्रिकेट बंद असले तरी प्रसारकांना खुश ठेवण्यासाठी लवकरच सामन्यांना पुन्हा सुरुवात करावी लागेल असे होल्डिंग यांना वाटते. तसेच त्यांनी पुढे सांगितले, सामन्यांचे प्रसारण करण्यासाठी वाहिन्या बरेच पैसे मोजतात. त्यांना अपेक्षित निकाल मिळाले नाहीत तर ते पैसे पुन्हा मागू शकतात. त्यामुळे प्रशासकांना खुश ठेवण्यासाठी प्रसारकांना लवकरच सामन्यांना पुन्हा सुरुवात करावी लागेल. हे सामने प्रेक्षकांविना होऊ शकतील आणि मी त्यांना दोष देणार नाही.

करोनामुळे सर्व खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. तसेच यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक ठरल्याप्रमाणे होण्याबाबतही साशंकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -