घरक्रीडा... त्यावेळी आश्चर्य वाटले होते!

… त्यावेळी आश्चर्य वाटले होते!

Subscribe

उपांत्य फेरीत फलंदाजी क्रमांकाबाबत कार्तिकची कबुली

विराट कोहलीच्या भारतीय संघाने मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात ९ पैकी ७ साखळी सामने जिंकत दिमाखात उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, या फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे तिसर्‍यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंडने भारतासमोर ५० षटकांत २४० धावांचे आव्हान ठेवले.

याचा पाठलाग करताना सलामीवीर लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली प्रत्येकी १ धाव करुन माघारी परतल्याने भारताची ३ बाद ५ अशी अवस्था झाली. यानंतर अनुभवी महेंद्रसिंग धोनी खेळपट्टीवर येईल अशी अपेक्षा होती. मात्र, दिनेश कार्तिक फलंदाजीला आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले, अगदी कार्तिकलासुद्धा!

- Advertisement -

मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणार असे संघ व्यवस्थापनाने मला सांगितले होते. त्यामुळे मला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात त्यावेळी खूप आश्चर्य वाटले होते. आम्ही झटपट विकेट गमावल्या आणि विकेटची पडझड थांबवणे गरजेचे होते. मला पॅड घालण्यास सांगण्यात आले. सगळेच खूप घाईमध्ये घडले. मी आरामात बसलो होतो आणि मला अचानक फलंदाजीस तयार होण्यास सांगितले गेले.

मला मैदानात उतरण्यास उशीर झाला, कारण विकेट पडेल अशी मला अपेक्षा नव्हती. राहुल तिसर्‍या षटकात बाद झाला आणि मला फलंदाजीला उतरावे लागले. मी कधी बाद झालो आठवत नाही आणि त्याने फरकही पडत नाही, पण मी ट्रेंट बोल्टची गोलंदाजी खेळून काढली. तोच आम्हाला सर्वाधिक अडचणीत टाकत होता. त्यानंतर मी धावांची गती वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, जिमी निशमने उत्कृष्ट झेल पकडल्याने मला माघारी परतावे लागले, असे कार्तिक म्हणाला.

- Advertisement -

काय घडले त्या सामन्यात?
न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांचा पाठलाग करताना भारताची ६ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. मात्र, रविंद्र जाडेजा (७७) आणि महेंद्रसिंग धोनी (५०) यांनी शतकी भागीदारी करत भारताला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. भारताला १४ चेंडूत ३२ धावांची गरज असताना बोल्टने जाडेजाला माघारी पाठवले. पुढच्याच षटकात मार्टिन गप्टिलने धोनीला धावचीत केले. यानंतर तळाच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव २२१ धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -