कुस्तीचा थरार अंतिम टप्प्यात; हर्षवर्धनला डबल महाराष्ट्र केसरीची संधी

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला नवीन वर्षाचा मुहुर्त मिळाला. या स्पर्धेतील लढत चुरशीची झाली. माती व गादी या दोन्ही विभागात अटीतटीची लढत झाली. माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरचा महेंद्र गायकवाड व कोल्हापूरचा शुभम शिदनाळेत लढत झाली.

संग्रहित

पुणेः महाराष्ट्र केसरीचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. माती व गादी विभागातून स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिंकदर शेख तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे हे अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्यातील माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला डबल महाराष्ट्र केसरी होण्याची संधी आहे.

गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला नवीन वर्षाचा मुहुर्त मिळाला. या स्पर्धेतील लढत चुरशीची झाली. माती व गादी या दोन्ही विभागात अटीतटीची लढत झाली. माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरचा महेंद्र गायकवाड व कोल्हापूरचा शुभम शिदनाळे यांच्यात लढत झाली. महेंद्र गायकवाडने शुभम शिदनाळेवर मात केली. अवघ्या दहा सेकंदाचा हा खेळ झाला. महेंद्र गायकवाडने अशी खेळी खेळली की शुभमचा तोल गेला. त्याचाच फायदा घेत महेंद्र गायकवाडने शुभमला मात दिली. त्यामुळे महेंद्रचा विजय झाला व तो अंतिम फेरीत दाखल झाला.

माती विभागाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमचा सिकंदर शेख व बुलढाण्याचा बालारफिक शेख यांच्यात लढत झाली. हा खेळ अवघ्या ३० सेकंदाचा झाला. बालारफिकला मात देत सिकंदरने अंतिम फेरीत प्रवेश केला. सिकंदर शेखने शेखवर पहिल्या १५ सेकंदातच ताबा मिळविला. आपले आक्रमण कायम ठेवत सिकंदर शेखने बालरफिकवर विजय मिळवला. चित्तथरारक हा सामना झाला.

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे.  ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समितीमध्ये वाद होता. महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदचे बरखास्त करण्यात आली. त्यानंतर या वादावर तोडगा निघाला व महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला.