विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मैराज खानला सुवर्णपदक

भारताचा अनुभवी नेमबाज मैराज खानने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरूषांच्या स्कीट प्रकारात पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. ही स्पर्धा चांगवान येथे पार पडत आहे. ४० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ४६ वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. कोरियाच्या मिन्सू किम ३६ गुण आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन २६ गुण यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली.

दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला मैराज खान सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. मैराजने जिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. अंजुम मुदगिल, आशी चौक्सी आणि सिप्ट कौर सामरा या भारतीय त्रिकुटाने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.

कोण आहे मैराज खान ?

उत्तर प्रदेशात जन्म झालेला मैराज खान हा भारताचा अनुभवी नेमबाज आहे. मैराजने आतापर्यंत दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसेच जागतिक नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताला अनेक पदकं मिळवून दिली आहेत.

या स्पर्धेत भारताच्या अनिश भानवाला आणि रिधम सांगवान या युवा नेमबाजांनी सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. दोघांनी आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. या भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ सामन्यात झेकच्या अॅना डेडोवा आणि मार्टीन पोड्रास्की जोडीचा १६-१२ असा पराभव केला आहे. आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकातील जोडी म्हणून अनिश आणि रिधमचे हे दुसरे पदक आहे.


हेही वाचा : वेस्ट इंडिजच्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती