‘हा’ राष्ट्रवादीच्या माथी खापर फोडण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचे रामदास कदमांना प्रत्युत्तर

मुंबई : बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली. ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि आपली ही कृती योग्य आहे, हे दाखविण्यासाठीच त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथी फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असे प्रत्युत्ततर राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.

जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला होता. त्यानंतर आता माजी मंत्री रामदास कदम यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी आज केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिंदे गटाने शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजप असून २०१९मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार-खासदार यांना भयभीत केले गेले आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे कसे चुकले, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र ज्यांना निवडून दिले, त्यांनी मातोश्रीशी कशी गद्दारी केली, हे राज्यातील जनता व शिवसैनिक पाहात आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

शरद पवार यांनी २०१९मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना तसेच रिमोट कंट्रोल चालवणार्‍या भाजपाचा पराभव होईल, ही भीतीही त्यांना असल्याचे तपासे म्हणाले.

ठाकरे कुटुंबाचे योगदान नाही का?
आज शिवसेना फोडून शिंदे आपली शिवसेना खरी आहे, हे सांगत आहेत. मग इतकी वर्षे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना वाढीसाठी केलेली मेहनत काहीच नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे. ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठावान सामान्य शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर थेट टीका न करता शिंदे गट राष्ट्रवादीवर तोंडसुख घेत आहे, असेही महेश तपासे म्हणाले.