घरक्रीडाकुलदीप, माझ्या यशात धोनीची भूमिका महत्त्वाची - चहल

कुलदीप, माझ्या यशात धोनीची भूमिका महत्त्वाची – चहल

Subscribe

सामन्यादरम्यान धोनीने नेहमीच आमची मदत केली आहे, असे युजवेंद्र चहल म्हणाला.

कुलदीप यादव आणि माझ्या यशात महेंद्रसिंग धोनीची खूप महत्त्वाची भूमिका आहे, अशा शब्दांत लेगस्पिनर युजवेंद्र चहलने भारताच्या माजी कर्णधाराची स्तुती केली. धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी आणि प्रभावी कर्णधारांपैकी एक आहे. धोनी आता एका वर्षाहूनही जास्त काळ क्रिकेट खेळलेला नसला तरी युवा खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. धोनी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर विराट कोहलीला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कोहलीच्या नेतृत्वात खेळताना चहलने सातत्यपूर्ण कामगिरी केली असली तरी धोनीचे मार्गदर्शन त्याच्यासाठी कायमच बहुमूल्य ठरले आहे.

सामन्यादरम्यान नेहमीच मदत केली

धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. माझ्या आणि कुलदीपच्या यशात त्याची खूप महत्त्वाची भूमिका आहे. सामन्यादरम्यान त्याने नेहमीच आमची मदत केली आहे. एखाद्या फलंदाजाने माझ्या गोलंदाजीवर चौकार लगावल्यानंतर धोनी माझ्याजवळ येऊन मला समजावतो. ‘या फलंदाजाला गुगली टाक, त्याला फटका मारता येणार नाही,’ असे तो मला सांगतो आणि याचा मला खूप उपयोग होतो. त्याचा सल्ला नेहमीच संघाच्या हिताचा असतो, असे चहल एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

सल्ल्याचा खूपदा फायदा

धोनीच्या सल्ल्याचा मला खूपदा फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत मी पहिल्यांदा सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. त्यावेळी जेपी ड्युमिनी फलंदाजी करत होता आणि सहाजिकच मला त्याला बाद करायचे होते. धोनी माझ्याकडे येऊन म्हणाला की, ‘जेपीला फक्त सरळ म्हणजेच यष्टींवर चेंडू टाक’. मी त्याच्या सल्ल्यानुसार गोलंदाजी केली. जेपीने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सरळ टाकल्याने तो पायचीत झाला, असेही चहल म्हणाला.

‘तो’ नेहमीच समस्या दूर करतो

कर्णधार विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असल्याने एकदिवसीय सामन्यात अखेरच्या षटकांत तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करतो. त्यावेळी आम्हाला काही समस्या असल्यास धोनी ती दूर करतो असे युजवेंद्र चहल म्हणाला. ४० षटकांनंतर विराट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करतो. त्यामुळे त्याला सर्व खेळाडूंशी संवाद साधणे अवघड होते. त्यावेळी मी धोनीकडे पाहतो आणि माझ्याकडे फक्त पाहून त्याला समजते की, मला त्याला काहीतरी विचारायचे आहे. तो लगेच माझ्याजवळ येतो आणि माझी समस्या दूर करतो, असे चहलने सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -