Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा रणजीमध्ये मुंबईची गाडी पुन्हा रुळावर येणे गरजेचे - अमोल मुजुमदार

रणजीमध्ये मुंबईची गाडी पुन्हा रुळावर येणे गरजेचे – अमोल मुजुमदार

Related Story

- Advertisement -

मुंबई हा भारतीय स्थानिक क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघ. मुंबईने आतापर्यंत विक्रमी ४१ वेळा रणजी करंडक आपल्या नावे केला आहे. परंतु, मुंबईचे अखेरचे जेतेपद २०१५-१६ मोसमात आले होते. त्यानंतर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. परंतु, पाच वर्षांत मुंबईला रणजीच्या जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. आता मुंबईची गाडी पुन्हा रुळावर आणण्याची जबाबदारी नवे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या खांद्यावर आहे. मुजुमदार यांची स्थानिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. ते संघात असताना मुंबईने १६ पैकी ८ मोसमांत रणजी करंडक पटकावला होता. आता प्रशिक्षक म्हणूनही दमदार कामगिरी करण्यासाठी अमोल तयार आहेत. त्यांच्याशी केलेली खास बातचीत…

 • मुंबईचे १६ वर्षे प्रतिनिधित्व केल्यावर आता तुम्हाला पहिल्यांदा या संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी मिळत आहे. या संधीसाठी किती उत्सुक आहात?
  – नक्कीच खूप उत्सुक आहे. परंतु, इतकी वर्षे खेळल्यानंतर मला एक गोष्ट कळली आहे की तुम्ही फार उत्सुक असून चालत नाही. तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याची मला कल्पना आहे.
 • मुंबईच्या प्रशिक्षकपदासाठी तुमच्यासोबत वसिम जाफर, साईराज बहुतुले, सुलक्षण कुलकर्णी आणि बलविंदर संधू यांच्यासारखे दिग्गज शर्यतीत होते. परंतु, क्रिकेट सुधार समितीने (सीआयसी) तुमच्यावर विश्वास दाखवला ही तुमच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे?
  – माझ्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे. माझे जे प्रतिस्पर्धी होते, त्यांच्यासाठी माझ्या मनात खूप मोठे स्थान आहे. सुलक्षणसोबत मी बरीच वर्षे क्रिकेट खेळलो. बलविंदर संधू हे चंद्रकांत पंडित आणि प्रवीण आमरे यांच्यासह मुंबईच्या सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहेत. साईराजसोबत मी अनेक वर्षे मुंबईकडून खेळलो असून त्याने प्रशिक्षक म्हणूनही माझ्यासोबत काम केले आहे. वसिम जाफरबद्दल बोलावे तितके कमीच आहे. मी जितकी वर्षे मुंबईकडून खेळलो, तेव्हा माझी आणि वसिमची जोडी होती. त्याच्याविषयी मला खूप आदर आहे. मी या सगळ्यांना मागे सोडून नाही, तर त्यांच्या शुभेच्छा घेऊनच पुढे जात आहे.
 • मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवलेले चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, रमेश पोवार यांच्याप्रमाणे तुम्हीसुध्दा रमाकांत आचरेकर यांचे शिष्य आहात. आचरेकर सरांकडून मिळालेली शिकवण तुम्हाला आता कशी उपयोगी ठरेल?
  – आचरेकर सर आम्हाला थोड्या वेळात खूप मोठ्या गोष्टी शिकवून गेले. त्यांचीच शिकवण आम्ही पुढे चालवत आहोत. चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे किंवा अगदी सचिन तेंडुलकरशी बोलताना सरांचा विषय निघतोच. सरांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे, ती आम्ही पुढील पिढीतील क्रिकेटपटूंना देण्याचा प्रयत्न करत आहोत.
 • मुंबईने मागील काही वर्षांत दोनदा विजय हजारे करंडकाचे जेतेपद पटकावले असले तरी त्यांना रणजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्याबद्दल काय सांगाल?
  – आताचे क्रिकेट हे दोन भागांमध्ये विभागले पाहिजे. एक म्हणजे लाल चेंडूने होणारे, चार किंवा पाच दिवसांचे क्रिकेट आणि दुसरे म्हणजे मर्यादित षटकांचे क्रिकेट. लाल चेंडूने होणाऱ्या क्रिकेटमध्ये म्हणजेच रणजी करंडकात मुंबईची गाडी पुन्हा रुळावर येणे गरजेचे आहे. मुंबईचा संघ रणजी स्पर्धेतील कामगिरीसाठी ओळखला जातो. त्यामुळे रणजीमध्ये मुंबईच्या कामगिरीत सुधारणा घडवण्याचा माझा प्रयत्न असेल. परंतु, त्याचवेळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्य राखणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे.
 • मागील काही वर्षांत सौराष्ट्र, गुजरात यांसारखे संघ रणजी स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करणे किती अवघड असेल?
  – इतर संघांचा दर्जा वाढत आहे, यात जराही शंका नाही. परंतु, याचा अर्थ मुंबईचा दर्जा खालावतोय, असा अजिबातच होत नाही. आजही मुंबईचे सात खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे अजूनही मुंबईचा दबदबा कायम आहे. केवळ मुंबईच्या कामगिरीत सातत्य गरजेचे आहे.
 • मुंबईचे सात खेळाडू सध्या भारताकडून खेळत असले तरीही मुंबईच्या संघात आदित्य तरे आणि धवल कुलकर्णी यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. तुमच्या योजना युवा खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची भूमिका किती महत्त्वाची असेल?
  – अनुभवी खेळाडू हे प्रत्येक संघासाठी खूप महत्त्वाचे असतात. याचे कारण म्हणजे अनुभव तुम्हाला कुठेही विकत मिळत नाही. तुम्हाला त्यासाठी घाम गाळावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अनुभवी खेळाडूंची भूमिका महत्वाची असणारच आहे. त्यांना मान मिळाला पाहिजे. परंतु, त्याचवेळी युवा खेळाडूंनाही तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे. मुंबईच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल आहे. त्यांना एकत्रित खेळायला लावण्यासाठीच मी हे प्रशिक्षकपद स्वीकारले आहे.
 • फलंदाजी हे मुंबईचे बलस्थान मानले जाते. गोलंदाजी मात्र तितकीशी मजबूत वाटत नाही. याबाबत काय सांगाल? तुम्ही त्यासाठी कशाप्रकारे योजना आखणार आहात?
  – गोलंदाजी ही मुंबईची मजबूत बाजू नाही असे आपण म्हणू शकतो. परंतु, मुंबईकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता आहे, असे अजिबातच नाही. या प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे हे माझे काम आहे आणि ते मी करेन. त्यासाठी विविध योजना आखणे गरजेचे आहे आणि इतरांची साथ लाभल्यास आम्ही नक्कीच चांगले, प्रतिभावान गोलंदाज शोधून त्यांना संधी देऊ.
 • मोसम सुरु होण्यासाठी अजून बराच काळ शिल्लक आहे. या वेळेचा तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी वापर करायला आवडेल?
  – माझ्या मते, दोन ‘एफ’ खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे फिटनेस आणि दुसरी म्हणजे फिल्डिंग. तुम्ही फिटनेसवर जितकी मेहनत घ्याल, तितकी तुमची कारकीर्द वाढते. तुमच्या कारकिर्दीची दिशा बदलते. आपल्यासमोर विराट कोहलीचे उत्तम उदाहरण आहे. तसेच फिल्डिंगचा (क्षेत्ररक्षण) दर्जा सुधारणे खूप गरजेचे आहे. आता क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग यांच्यासह फिटनेस हे क्षेत्रसुद्धा महत्वाचे झाले आहे.
 • तुम्ही याआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिकन संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहेत. हा अनुभव आता किती फायदेशीर ठरेल?
  – राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जॉस बटलर यांसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कशाप्रकारे तयारी करतात याचा मी खूप जवळून अनुभव घेतला. ते किती बारकाईने आणि नियोजनबद्ध सराव करतात हे मला कळले. दक्षिण आफ्रिकन संघ भारतात आला, तेव्हा त्यांचे फलंदाजी प्रशिक्षकपद भूषवणे हा अनुभव मला फार समृद्ध करणारा ठरला. मी पहिल्यांदा कसोटी क्रिकेट अनुभवले. डू प्लेसिस, कागिसो रबाडा, डीन एल्गर यांच्यासह एडन मार्करमसारख्या नव्या खेळाडूंसोबत मी खूप काम केले. मी या सर्व अनुभवातून एक गोष्ट शिकलो की, परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडू असो किंवा भारताचा स्थानिक क्रिकेटपटू असो, मैदानात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. प्रशिक्षक म्हणून त्या गरजा पूर्ण करणे हे माझे काम असते. हा अनुभव मुंबईला प्रशिक्षण देताना आता मला नक्कीच फायदेशीर ठरेल.
- Advertisement -