Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा ENG vs NZ : डेवॉन कॉन्वेचे पदार्पणातच द्विशतक; मोडला १२५ वर्षांपासूनचा विक्रम

ENG vs NZ : डेवॉन कॉन्वेचे पदार्पणातच द्विशतक; मोडला १२५ वर्षांपासूनचा विक्रम

कॉन्वेने ३४७ चेंडूत २२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०० धावांची खेळी केली.

Related Story

- Advertisement -

न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वेने कसोटी पदार्पणातच द्विशतक करण्याचा पराक्रम केला आहे. लॉर्ड्सवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कॉन्वेने ३४७ चेंडूत २२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०० धावांची खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान त्याने इंग्लंडचे माजी कर्णधार केएस रणजितसिंहजी यांचा १२५ वर्षांपासूनचा विक्रम मोडला. इंग्लंडमध्ये कसोटीत पदार्पण करताना याआधी सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम रणजितसिंहजी यांच्या नावे होता. त्यांनी १८६९ मध्ये मँचेस्टर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५४ धावांची खेळी केली होती. परंतु, आता त्यांचा हा विक्रम कॉन्वेने मोडला आहे. त्याने पदार्पणातच द्विशतक करण्याची कामगिरी केली.

पदार्पणात द्विशतक करणारा पहिलाच 

तसेच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर कसोटी पदार्पणात द्विशतक करणारा कॉन्वे हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने या खेळीदरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचाही विक्रम मोडला. लॉर्ड्सवर कसोटी पदार्पणात सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम गांगुलीच्या नावे होता. गांगुलीने १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध १३१ धावांची खेळी केली होती. परंतु, कॉन्वे इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी १३६ धावांवर नाबाद होता. त्यामुळे त्याला गांगुलीचा विक्रम मोडण्यात यश आले.

न्यूझीलंडने मारली ३७८ धावांची मजल

- Advertisement -

कॉन्वेने केलेल्या द्विशतकामुळे इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने ३७८ धावांची मजल मारली. कॉन्वेला हेन्री निकोल्सची उत्तम साथ लाभली. निकोल्सने १७५ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला तीस धावांचा टप्पा पार करता आला नाही. इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या ऑली रॉबिन्सनने चार, तर मार्क वूडने तीन गडी बाद केले.

- Advertisement -