घरक्रीडाया कुत्र्यामुळे इंग्लडने जिंकला FIFA वर्ल्ड कप

या कुत्र्यामुळे इंग्लडने जिंकला FIFA वर्ल्ड कप

Subscribe

ही घटना आहे १९६६ सालची. १९६६ सालचा 'फिफा वर्ल्डकप' इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. सहाजिकच इंग्लंडची फुटबॉल टीमही सामन्यात खेळणार होती. याच पार्श्वभूमीवर संघातील खेळाडूंना देशभरातून प्रोत्साहीत केले जात होते. सामन्यापूर्वी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत होते. मात्र, यादरम्यान 'पिक्सल' नावाचा एक कुत्रासुद्धा या कौतुकाचा भागीदार ठरला होता. जगभरातील लोकांकडून पिक्सलला भरभरुन प्रेम मिळत होतं. इंग्लडवासियांनी तर त्याला 'आपल्या देशाची शान' असा खिताब दिला होता. मात्र, नेमकं काय होतं यामागचं कारण? 

आम्ही तुम्हाला सांगितलं की, ‘एकेकाळी फुटबॉल वर्ल्ड कप टुर्नामेंटच्या भव्य आयोजनाला एका छोट्याशा कुत्र्याने वाचवलं होतं आणि इतकंच नाही तर त्याने इंग्लड देशाला चॅम्पियन बनवण्यातही मदत केली होती’, तर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला ही एखादी काल्पनिक गोष्ट वाटेल. मात्र, खरोरच ही घटना वास्तवात घडलेली आहे. जाणून घेऊया नक्की काय आहे ही गोष्ट. ही घटना आहे १९६६ सालची. १९६६ सालचा ‘फिफा वर्ल्डकप’ इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. सहाजिकच इंग्लंडची फुटबॉल टीमही सामन्यात खेळणार होती. याच पार्श्वभूमीवर संघातील खेळाडूंना देशभरातून प्रोत्साहीत केले जात होते. सामन्यापूर्वी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत होते. मात्र, यादरम्यान ‘पिक्सल’ नावाचा एक कुत्रासुद्धा या कौतुकाचा भागीदार ठरला होता. जगभरातील लोकांकडून पिक्सलला भरभरुन प्रेम मिळत होतं. इंग्लडवासियांनी तर त्याला ‘आपल्या देशाची शान’ असा खिताब दिला होता. मात्र, नेमकं काय होतं यामागचं कारण?

हाच तो स्टार डॉग – पिक्सल (सौजन्य- Facebook/twitter)

…चक्क ‘ट्रॉफी’च गेली चोरीला

१९९६ चा वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळवला जाणार असल्याने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. इंग्लंड सरकारलासुद्धा हा क्षण खूप मोठ्या पातळीवर साजरा करायचा होता. त्यामुळे खुद्द इंग्लडच्या राणीच्या देखरेखीखाली एका जंगी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यातील प्रदर्शनात फुटबॉल वर्ल्डकपची शानदार ट्रॉफी लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. मात्र सामना ४ दिवसांवर आला असताना ही ट्रॉफी दिवसाढवळ्या प्रदर्शनामधून चोरीला गेली आणि सगळ्यांचाच तोंडचं पाणी पळालं.

- Advertisement -
1966 ची फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफी (सौजन्य- Facebook/twitter)

जगभरात झालेली इंग्लडची नाच्चकी

वर्ल्डकप सामन्यापूर्वी विजयाची ट्रॉफी चोरीला जाणं ही संपूर्ण देशासाठी शरमेची गोष्ट होती. सिक्युरिटी गार्ड काही वेळासाठी आपली जागा सोडून गेल्यामुळे ही घटना घडली होती. इंग्लंडची जगभरात नाच्चकी होईल, अशी ही घटना होती. जगभरातील माध्यमांमध्ये ट्रॉफी चोरीला गेल्याचीच बातमी झळकत होती. पोलिसांनी प्राण पणाला लावून शोध घेतला, मात्र चोरी नेमकी कोणी केला? याचा तपास लागत नव्हता. ट्रॉफी मिळणं कुठल्याही परिस्थितीत आवश्यक होतं. यावेळी सर्वांच्या मदतीला धावून आला पिक्सल नावाचा छोटासा कुत्रा.

पिक्सलने वाचवली इंग्लंडची ‘इज्जत’

दरम्यान एका खासगी गुप्तहेर संस्थेच्या अधिकऱ्याने ट्रॉफी चोरणाऱ्या जॅक्सन नावाच्या माणसाला अटक केली होती. मात्र, अद्याप ट्रॉफीचा पत्ता लागत नव्हता. एकीकडे ट्रॉफी मिळत नव्हती तर दुसरीकडे वर्ल्डकप सामन्याची तारीख आणखीन जवळ येत होती. अखेर २७ मार्चचा ‘तो’ सोनेरी दिवस उजाडला. या दिवशी साऊथ लंडनच्या नॉरवूडमध्ये राहणारा डेव कॉर्बेट हा युवक त्याच्या पिक्सल नावाच्या कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी बाहेर पडला होता.

- Advertisement -

कॉर्बेटने दिलेल्या माहितीनुसार, पिक्सल एका कार जवळ थांबून सतत तिच्याभोवती चक्रा मारत होता. त्यावेळी कॉर्बेटची नजर जवळच पडलेल्या एका पॅकेटवर पडली. ते पाकिट एका वर्तमानपत्रात गुंडाळलेलं होतं. उत्सुकतेपोटी कॉर्बेटने ते पॅकेट फाडल्यावर त्याला एका बाजूला ब्राझील, वेस्ट जर्मनी आणि उरुग्वे असे शब्द लिहिलेले दिसले. तर दुसऱ्या बाजूला पाहिल्यावर एका बाईने आपल्या हातात टोकरी उचलून धरल्याचं चित्र त्याला दिसलं. वर्ल्डकपची ट्रॉफी चोरीला गेल्याची घटना ठाऊक असलेल्या कॉर्बेटला या पार्सलबाबत शंका आली. यानंतर तातडीने पोलीस स्टेशन गाठत त्याने ते पार्सल पोलीसांच्या हातात दिले आणि ज्याची भीती नॉरवूनला वाटत होती तेच घडले. त्या पार्सलमध्ये चोरीला गेलेली ती वर्ल्डकपची ट्रॉफीच निघाली.

पिक्सल आणि त्याचा मालक डेव कॉर्बेटचा दुर्मिळ फोटो (सौजन्य- Facebook/twitter)

पिक्सल रातोरात बनला होता ‘स्टार’

सुरुवातीला स्कॉटलंड यार्ड पोलिसांना डेव कॉर्बेट हाच ट्रॉफी चोर असल्याचा गैरसमज झाला. मात्र, बरेच तास चौकशी केल्यानंतर आणि कॉर्बेटकडून संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतरच पोलिसांना तो चोर नसल्याची खात्री पटली. पोलिसांच्या चौकशीतून सुटल्यानंतर बऱ्याच तासाने कॉर्बेट त्याचा कुत्रा पिक्सलला घेऊन आपल्या राहत्या घरी पोहोचला. मात्र, तोपर्यंत त्यांच्या घराबाहेर माध्यमांची चांगलीच गर्दी जमली होती. घडलेल्या प्रकाराविषयी तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारुन माध्यमांनी कॉर्बेटला हैराण करुन सोडले. मात्र, कॉर्बेटनेही माध्यमांपुढे पिक्सलचे भरभरुन कौतुक केले. कशाप्रकारे पिक्सलमुळे त्यांना ते पार्सल आणि पर्यायाने वर्ल्डकपची ट्रॉफी सापडली, याचं वर्णन त्याने माध्यमांसमोर मांडलं. यामुळे पिक्सल नावाचा तो छोटासा कुत्रा रातोरात इंटरनॅशनल स्टार बनला. जगभरातील लोकांच्या तोंडी पिक्सलचंच नाव होतं.

पुरस्कारांनी केले सन्मानित.. सिनेमातही मिळाले काम

फुटबॉल वर्ल्डकपची चोरीला गेलेली ट्रॉफी मिळवून दिल्यामुळे, पिक्सलला इंग्लंडच्या स्थानिकांनी देशाची शान असा खिताब दिला होता. याशिवाय पिक्सलला नॅशनल केनाईन डिफेंस लीगच्या वतीने मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर पिक्सलला ‘द स्पाय विथ कोल्ड नोज’ या सिनेमातही काम करण्याची विशेष संधी देण्यात आली होती. या सिनेमानंतर त्याला ‘डॉग ऑफ द इयर’ सारख्या नावाजलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. जगभरातल्या मोठमोठ्या ‘डॉग शोज’मध्येही पिक्सलला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.

ट्रॉफी चोरीच्या घटनेनंतर एक वर्ष यशाची चव चाखलेल्या पिक्सलचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. आजही इंग्लंडमध्ये पिक्सलच्या आठवणी जतन केलेल्या पाहायला मिळतात.

माध्यमांचे कॅमेरे पिक्सलला टिपताना.. (सौजन्य- Getty Images)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -