घरक्रीडाVijay Hazare Trophy : कर्णधार पृथ्वी शॉची दमदार कामगिरी सुरूच, मुंबई उपांत्य फेरीत

Vijay Hazare Trophy : कर्णधार पृथ्वी शॉची दमदार कामगिरी सुरूच, मुंबई उपांत्य फेरीत

Subscribe

मुंबईने उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्रचा ९ विकेट आणि ४९ चेंडू राखून धुव्वा उडवला.

कर्णधार पृथ्वी शॉने केलेल्या धमाकेदार शतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबईने उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्रचा ९ विकेट आणि ४९ चेंडू राखून धुव्वा उडवला. पृथ्वीने विजय हजारे करंडकात उत्कृष्ट कामगिरी केली असून सौराष्ट्रविरुद्ध त्याने १२३ चेंडूत २१ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १८५ धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या स्पर्धेतील तिसरे शतक ठरले. याआधी त्याने सलामीच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, तर पुदुच्चेरीविरुद्ध नाबाद २२७ धावांची खेळी केली होती.

व्यास, जानीची फटकेबाजी

मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अवि बारोट (३७) आणि स्नेल पटेल (३०) या सलामीवीरांनी सौराष्ट्रच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र, डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने पटेलला बाद करत सौराष्ट्रला पहिला झटका दिला. तसेच बारोट, प्रेरक मंकड (४) आणि अर्पित वसावडा (१०) हेसुद्धा झटपट बाद झाल्याने सौराष्ट्रची ४ बाद १२१ अशी अवस्था झाली होती. परंतु, विश्वराज जाडेजाने (५३) सौराष्ट्रचा डाव सावरला. त्यानंतर अखेरच्या षटकांत समर्थ व्यास (नाबाद ९०) आणि चिराग जानी (नाबाद ५३) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे सौराष्ट्रने ५० षटकांत ५ बाद २८४ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

पृथ्वी-यशस्वीची द्विशतकी सलामी

२८५ धावांचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर पृथ्वी आणि यशस्वी जैस्वाल यांनी अप्रतिम फलंदाजी केली. या दोघांनी ३४.५ षटकांत २३८ धावांची सलामी दिली. यात डावखुऱ्या यशस्वीचा १०४ चेंडूत ७५ धावांचा वाटा होता. पृथ्वीने नाबाद १८५ धावांची खेळी केली. हे त्याचे स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. पुढे त्याला अनुभवी आदित्य तरेने उत्तम साथ दिल्याने मुंबईने २८५ धावांचे आव्हान ४१.५ षटकांतच पूर्ण केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -