घरक्रीडाद्रविड इन, शास्त्री आऊट? ‘या’ तीन गोष्टी घडल्यास रवी शास्त्रींचे प्रशिक्षकपद येऊ...

द्रविड इन, शास्त्री आऊट? ‘या’ तीन गोष्टी घडल्यास रवी शास्त्रींचे प्रशिक्षकपद येऊ शकेल धोक्यात

Subscribe

पुढील तीन महिने शास्त्रींसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनात मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. भारताचा संघ सलग पाच वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी राहिला. भारताला ऑस्ट्रेलियात सलग दोनदा कसोटी मालिका जिंकण्यातही यश आले. परंतु, भारताला आयसीसीची एकही जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. मागील महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. तसेच २०१९ सालच्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली होती, पण त्यावेळीही भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे काही भारतीय चाहते शास्त्री यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी करत आहे. आता पुढील तीन महिने शास्त्रींसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या तीन महिन्यांत तीन गोष्टी घडल्यास शास्त्रींचे प्रशिक्षकपद धोक्यात येऊ शकेल. ‘या’ तीन गोष्टी कोणत्या?

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत पराभव

भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबर यजमान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल. इंग्लंडला मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी सलग दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत. त्यामुळे ही मालिका इंग्लंडमध्ये होत असली तरी भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारताला पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत पराभव पत्करावा लागल्यास भारताचे प्रशिक्षक शास्त्रींवर अधिकच दडपण येईल.

द्रविडच्या मार्गदर्शनात श्रीलंकेत चांगली कामगिरी 

इंग्लंडचा एक संघ सध्या इंग्लंडमध्ये असतानाच दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. भारताचा संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी राहुल द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक झाली आहे. भारताच्या या संघात बऱ्याच नवख्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यास आणि भारताला श्रीलंकेतील दोन्ही मालिका जिंकण्यात यश आल्यास द्रविडला कायमचे मुख्य प्रशिक्षकपद देण्याबाबत बीसीसीआयला विचार करावा लागू शकेल.

टी-२० वर्ल्डकप जिंकण्यात अपयश 

रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनात भारताला आयसीसीची जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. परंतु, येत्या काही महिन्यांत यात बदल करण्याची शास्त्री यांना संधी मिळणार आहे. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ओमान आणि युएईत टी-२० वर्ल्डकप होणार आहे. भारताला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यातच या स्पर्धेपूर्वी आयपीएल स्पर्धा युएईत होणार असल्याने भारतीय खेळाडूंना तेथील खेळपट्ट्यांचा आणि वातावरणाचा पुरेसा अंदाज येईल. मात्र, त्यानंतरही भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकण्यात अपयश आले, तर शास्त्रींचे प्रशिक्षकपद धोक्यात येऊ शकेल.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -