घरक्रीडागाऊ त्यांना आरती!

गाऊ त्यांना आरती!

Subscribe

रणजी करंडकात सर्वाधिक बळी टिपणारे डावखुरे फिरकीपटू राजिंदर गोयल यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. स्थानिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतरही त्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय क्रिकेटमधील ‘कोटा सिस्टिम’च्या कहाण्या तेव्हा सर्वश्रुत होत्या. गोयल हे त्या सिस्टिमचेच बळी म्हणावे लागतील. बीसीसीआयने २०१७ मध्ये त्यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. बहुधा आपली चूक सुधारण्याचा बीसीसीआयचा हा प्रयत्न असावा.

भारतातील सर्वोत्तम डावखुर्‍या मंदगती गोलंदाजांपैकी एक म्हणजे राजिंदर गोयल! कसोटी क्रिकेटचा टिळा मात्र त्यांना लागला नाही. तब्बल २८ मोसम (१९५७-५८ ते १९८४-८५) भारतातील विविध मैदानांवर आपल्या फिरकीची कमाल दाखवणार्‍या गोयल यांची पतौडी, बेदी, गावस्कर, विश्वनाथ, कपिल देव या सर्व भारतीय कर्णधारांनी तारीफ केली. मात्र, गोयल यांना कसोटी कॅपने हुलकावणीच दिली.

प्रसन्ना, बेदी, चंद्रा, वेंकट या नामवंत फिरकी चौकडीच्या काळातच गोयल यांची कारकीर्द घडली; पण एकदा हातातोंडाशी आलेली त्यांची कसोटी पदार्पणाची संधी हुकली. १९७४ च्या मोसमात बीसीसीआयने बेदीवर शिस्तभंगाची कारवाई केली आणि १४ जणांच्या भारतीय कसोटी चमूत गोयल यांची वर्णी लागली. लॉईडच्या विंडीजविरुद्ध बंगलोरच्या कसोटीत आदल्या दिवशीपर्यंत गोयल यांचे कसोटी पदार्पण निश्चित असल्याची चर्चा होती. परंतु, टॉसच्या वेळी प्रसन्ना-वेंकट ही ऑफस्पिनर्सची जोडी चंद्रासह मैदानात उतरली आणि गोयल हे राखीव खेळाडूच राहिले. राष्ट्रीय निवड समितीचे तत्कालीन अध्यक्ष सी. डी. गोपीनाथ यांनी आपल्या गावच्या वेंकटला संधी दिली. त्यानंतर पतौडी, गावस्कर दुखापतीमुळे दिल्लीतील कोटला कसोटीला मुकले आणि वेंकटला कर्णधारपदी बढती मिळाली. याच कर्णधार वेंकटची पुढच्या तीन कसोटीत संघातून हकालपट्टी करण्यात आली.

- Advertisement -

भारतीय क्रिकेटमधील ‘कोटा सिस्टिम’च्या कहाण्या तेव्हा सर्वश्रुत होत्या. गोयल हे त्या सिस्टिमचेच बळी म्हणावे लागतील. असे असले तरी एक आठवण मात्र गोयल यांच्या सदैव स्मरणात राहिली. रणजी स्पर्धेत गोयल यांनी ६०० बळींचा टप्पा पार केल्यावर ग्वाल्हेर येथील कारागृहातून त्यांना अभिनंदनपर पत्र आले, तेदेखील खतरनाक दरोडेखोर भुखासिंह यादव याचे! काहीशा भयभीत झालेल्या गोयल यांनी लिफाफा उघडला आणि मजकूर वाचून त्यांना आनंद झाला. ‘रणजीमध्ये ६०० बळींचा टप्पा पार केल्याबद्दल माझ्याकडून अभिनंदनाचा कृपया स्वीकार करावा. मी तुमचा चाहता आहे आणि तुम्हाला जीवनात अधिकाधिक यश लाभावे ही सदिच्छा!’ असे त्या पत्रात लिहिले होते. निवड समितीने उपेक्षा केली तरी गोयल यांनी आपल्या या अनोख्या चाहत्याचे पत्र जपून ठेवले.

भारतीय क्रिकेट जगतात विलक्षण दबदबा असलेल्या सुनील गावस्करने आपल्या ‘आयडॉल्स’ या पुस्तकात गोयल यांना मानाचे स्थान दिले. डावखुरे फिरकीपटू सुनीलला जरा त्रासदायक ठरत. इंग्लंडचा डेरेक अंडरवूड सुनीलला सतवायचा आणि स्थानिक क्रिकेटमध्ये गोयल त्याला डोकेदुखी ठरत. रणजी आणि दुलीप करंडकात तब्बल पाच वेळा गोयल यांनी सुनीलची विकेट काढली. गोयल यांनी रणजी स्पर्धा गाजवली. हरियाणाकडून रणजी पदार्पणात गोयल यांनी रेल्वेचे ८ मोहरे ५५ धावात टिपले आणि हीच त्यांची सर्वोत्तम कामगिरी! बीसीसीआयने २०१७ मध्ये राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांचा सीके नायडू पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला. आपली चूक सुधारण्याचा बीसीसीआयचा हा प्रयत्न होता असे म्हणणे वावगे ठरू नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -