घरक्रीडामुंबईवर पुन्हा साखळीत गारद होण्याची नामुष्की!

मुंबईवर पुन्हा साखळीत गारद होण्याची नामुष्की!

Subscribe

सौराष्ट्रविरुद्धचा रणजी सामना अनिर्णित

भारतीय स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ मुंबईवर सलग दुसर्‍या वर्षी रणजी करंडकाच्या साखळीत गारद होण्याची नामुष्की ओढवली आहे. मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील एलिट ब गटातील सामना अनिर्णित राहिला. ४१ वेळेच्या रणजी विजेत्या मुंबईला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी सौराष्ट्रवर मात करणे गरजेचे होते. परंतु, चौथ्या दिवशी धर्मेंद्रसिंह जाडेजा आणि कमलेश मकवाना या सौराष्ट्रच्या आठव्या जोडीच्या चिवट फलंदाजीमुळे मुंबईला हा सामना जिंकण्यात अपयश आले. या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सौराष्ट्रने ३ गुणांची कमाई केली, तर मुंबईला केवळ १ गुण मिळाला. त्यामुळे मुंबईचे ८ सामन्यांनंतर केवळ १४ गुण आहेत. त्यांचा यंदाच्या मोसमातील अखेरचा सामना मध्य प्रदेशसोबत होणार आहे.

राजकोटला झालेल्या या सामन्यात मुंबईचा पहिला डाव २६२ धावांवर आटोपला, ज्याचे उत्तर देताना सौराष्ट्रने ३३५ धावा करत पहिल्या डावात ७३ धावांची आघाडी मिळवली. चौथ्या दिवशी मुंबईने आपला दुसरा डाव ७ बाद ३६२ धावांवर घोषित केला आणि सौराष्ट्रसमोर २९० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईकडून दुसर्‍या डावात सूर्यकुमार यादव (१३४) आणि शम्स मुलानी (९२) यांनी अप्रतिम फलंदाजी केली.

- Advertisement -

जाडेजा-मकवानाची चिवट फलंदाजी!
चौथ्या डावात २९१ धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्राच्या डावाची खराब सुरुवात झाली. ऑफस्पिनर शशांक अत्तरदेने चौथ्या षटकात स्नेल पटेल आणि दिव्यराज चौहान यांना खातेही न उघडता माघारी पाठवले. डावखुरा फिरकीपटू मुलानीने पहिल्या डावातील अर्धशतकवीर शेल्डन जॅक्सनला ११ धावांवर पायचीत पकडले. मुलानी आणि अत्तरदेने प्रत्येकी ३-३ गडी बाद करत सौराष्ट्रची ३४.१ षटकांत ७ बाद ८३ अशी अवस्था केली. मात्र, धर्मेंद्रसिंह जाडेजा (१२५ चेंडूत नाबाद ३३) आणि कमलेश मकवाना (११६ चेंडूत नाबाद ३१) या सौराष्ट्रच्या आठव्या जोडीने तब्बल ४० षटके खेळून काढल्याने हा सामना अनिर्णित राहिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -