घरक्रीडासर्फराजचा धावांचा पाऊस, गोलंदाजांत उनाडकटची चलती

सर्फराजचा धावांचा पाऊस, गोलंदाजांत उनाडकटची चलती

Subscribe

 रणजी करंडक

स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ मुंबईने यंदाच्या रणजी मोसमातही निराशजनक कामगिरी केली. एलिट गटात ८ साखळी सामन्यांपैकी केवळ १ सामना जिंकता आल्याने मुंबईला सलग दुसर्‍यांदा बाद फेरी गाठण्यात अपयश आले. एकीकडे मुंबई संघासाठी हा मोसम विसरण्याजोगा राहिला असला तरी त्यांचा युवा फलंदाज सर्फराज खान रणजीचा हा मोसम कधीही विसरु शकणार नाही. साखळी सामन्यांअंती सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये तो पाचव्या स्थानी होता.

सर्फराजने वडिलांच्या सांगण्यावरून काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून उत्तर प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, तिथे फारसे सामने खेळायला न मिळाल्याने त्याने पुन्हा मुंबई गाठली. त्यानंतर एक वर्ष त्याला संघाबाहेर राहणे बंधनकारक होते. यावर्षी मात्र त्याने झोकात पुनरागमन केले. २२ वर्षीय सर्फराजने यंदाच्या मोसमात ६ सामन्यांच्या ९ डावांत १५५ च्या सरासरीने ९२८ धावा चोपून काढल्या. पुनरागमनातील आपल्या तिसर्‍या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद ३०१ आणि चौथ्या सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध नाबाद २२६ धावांची खेळी करत त्याने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. तर मध्य प्रदेशविरुद्ध १७७ धावांची खेळी करत त्याने मोसमाचा शेवटही गोड केला.

- Advertisement -

सर्फराजप्रमाणेच अरुणाचल प्रदेशच्या रवी दलालसाठीही हा मोसम अविस्मरणीय ठरला. साखळी सामन्यांत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असणार्‍या दलालने ९ सामन्यांत ९५.७१ च्या सरासरीने १३४० धावा फटकावल्या. विराट कोहलीच्या नेतृत्वात २००८ सालचा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणार्‍या संघाचा भाग असणारा तरुवर कोहली साखळी सामन्यांत सर्वाधिक धावा करणार्‍यांत दुसर्‍या स्थानी राहिला. त्याने ९ सामन्यांत एका त्रिशतकाच्या मदतीने ९९८ धावा काढल्या. महाराष्ट्राकडून अनुभवी अंकित बावणेने ८ सामन्यांत ५७.३६ च्या सरासरीने ६३१ धावा केल्या.

दुसरीकडे मेघालयचा डावखुरा फिरकीपटू संजय यादव साखळीतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ९ सामन्यांच्या १५ डावांत ५५ गडी बाद केले. हरियाणाच्या हर्षल पटेलने ९ सामन्यांच्या १७ डावांत ५२ बळी घेतले. यंदा साखळी सामन्यांत सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तिसरा स्थानी राहिला तो सौराष्ट्रचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट. त्याने ७ सामन्यांतच ५१ गडी बाद केले. तसेच त्याने तब्बल ६ वेळा एका डावात पाच मोहरे टिपण्याची किमया साधली. त्याच्या या दमदार कामगिरीमुळेच सौराष्ट्रने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला ३० पेक्षा जास्त विकेट मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्राचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने सातत्यपूर्ण कामगिरी करताना ९ सामन्यांत ३७ बळी घेतले. परंतु, त्याला इतरांची फारशी साथ न लाभल्याने महाराष्ट्राला बाद फेरी गाठता आली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -