घरक्रीडासॅमसनमुळे पंतचे स्थान धोक्यात!

सॅमसनमुळे पंतचे स्थान धोक्यात!

Subscribe

अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीला संघाबाहेर ठेवत भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती युवा रिषभ पंतला जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. पंतकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. परंतु, पंतला या संधीचे सोने करता आलेले नाही. त्याने लवकरच आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे, अथवा त्याच्या जागी संजू सॅमसनला यष्टींमागे उभे राहण्याची संधी मिळेल, असे भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला वाटते.

राखीव यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनचा संघात समावेश करत भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने रिषभ पंतला ताकीद दिली आहे. पंतला बरीच संधी मिळाली आहे. मला खात्री आहे की, त्यांनी पंतसोबत चर्चा करत त्याला विश्वास दिला असेल. मात्र, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचा विश्वास खेळाडूने सार्थकी लावणे गरजेचे असते. दुर्दैवाने पंतला ते करता आलेले नाही. परंतु, तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे हेही तितकेच खरे आहे, असे लक्ष्मण यांनी सांगितले.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वीच पंत हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचा प्रमुख यष्टीरक्षक आहे असे म्हटले जात होते. मात्र, कसोटी संघात वृद्धिमान साहाने त्याची जागा घेतली आहे. पंतवर संघातील स्थान टिकवण्यासाठी खूप दबाव आहे, असे लक्ष्मणाला वाटते. फलंदाजीच्या वेळी तुम्ही फार गोष्टींचा विचार करता कामा नये. पंत जेव्हा फॉर्मात असतो आणि चांगली फलंदाजी करत असतो, तेव्हा त्याला रोखणे अवघड असते. मात्र, पंतवर सध्या खूप दबाव आहे, असे लक्ष्मण म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -