घरक्रीडाभारतासाठी करो या मरो!

भारतासाठी करो या मरो!

Subscribe

 न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना आजपासून

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उसळी घेणार्‍या चेंडूचा अप्रतिम वापर करत कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांसारखे अनुभवी फलंदाज असणार्‍या भारतीय संघाची दाणादाण उडवली. आता शनिवारपासून सुरु होणार्‍या दुसर्‍या कसोटीत या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे लक्ष्य असेल. दोन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर असल्याने त्यांना ख्राईस्टचर्चला होणारा दुसरा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य आहे आणि त्यासाठी फलंदाजांनी आपल्या कामगिरीत, तसेच तंत्रात सुधारणा करणे गरजेचे आहे.

वेलिंग्टनला झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. सध्याच्या घडीला सर्वोत्तम कसोटी संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताचा हा आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला. मात्र, हा पराभव विसरून भारताला शनिवारपासून सुरु होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भारताला ही मालिका गमवायची नसल्यास हॅग्ले ओव्हलवर होणारी ही कसोटी जिंकणे त्यांना अनिवार्य आहे. मात्र, भारताला विजय मिळवणे सोपे जाणार नाही. हॅग्ले ओव्हलवर झालेले ६ पैकी ५ कसोटी सामने न्यूझीलंडने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे ही मालिका बरोबरी संपवण्यासाठी भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागले.

- Advertisement -

खासकरून फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. या सामन्याच्या खेळपट्टीवरही बरेच गवत ठेवण्यात आले आहे. त्यातच कसोटीत मागील वर्षी न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट मिळवणार्‍या निल वॅग्नरचे संघात पुनरागमन होणार असल्याने भारतीय फलंदाजांना पुन्हा एकदा धावांसाठी झुंजावे लागेल. पहिल्या कसोटीत सलामीवीर मयांक अगरवाल (३४ आणि ५८) व अजिंक्य रहाणे (४६ आणि २९) यांचा अपवाद वगळता भारताच्या फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार कोहलीला न्यूझीलंड दौर्‍याच्या ९ डावांत केवळ १ अर्धशतक करता आले आहे. भारताला दुसर्‍या कसोटीत यश मिळवायचे असल्यास त्यांना कर्णधाराकडून मोठ्या खेळीची आवश्यकता आहे.

गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन आणि दुखापतग्रस्त ईशांत शर्माच्या जागी रविंद्र जाडेजा आणि उमेश यादवला संधी मिळू शकेल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजांची कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. परंतु, पहिल्या कसोटीत या दोघांनाही १-१ विकेटच मिळवता आली. मात्र, शमी आणि खासकरून बुमराह दमदार कामगिरी करेल असा विश्वास प्रशिक्षक शास्त्री यांना आहे. या दोघांना आपला फॉर्म सुधारण्यात यश आले, तर भारताला हा दुसरी कसोटी जिंकण्यात नक्कीच मदत होईल.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –
भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, रविंद्र जाडेजा, उमेश यादव, नवदीप सैनी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, टॉम लेथम, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, कायेल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, निल वॅग्नर, एजाज पटेल, डॅरेल मिचेल, मॅट हेन्री.

सामन्याची वेळ : पहाटे ४ पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -