घरक्रीडाश्रीकांतचे मलेशिया ओपनच्या जेतेपदाचे लक्ष्य

श्रीकांतचे मलेशिया ओपनच्या जेतेपदाचे लक्ष्य

Subscribe

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला काही दिवसांपूर्वीच झालेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचा डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनने पराभव केला होता. मात्र, जवळपास दीड वर्षांनंतर त्याला एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश आले होते, ही त्याच्यासाठी आनंदाची बाब होती. मात्र, आता एक पाऊल पुढे जाऊन मंगळवारपासून सुरू झालेल्या मलेशिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे श्रीकांतचे लक्ष्य आहे. श्रीकांतचे मागील जेतेपद २०१७ मध्ये आले आहे. त्यावेळी त्याने फ्रेंच ओपन ही स्पर्धा जिंकली होती.

मागील आठवड्यात इंडिया ओपनमध्ये मी ज्याप्रकारे खेळलो, त्याबाबत मी आनंदी आहे. यापुढेही मला प्रत्येक सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करायचा आहे. इंडिया ओपनमध्ये जवळपास प्रत्येकच सामन्यात मी सुरुवातीला पिछाडीवर होतो याची मला कल्पना आहे. मात्र, मी नंतर चांगला खेळ करत या सामन्यांमध्ये पुनरागमन केले आणि सामने जिंकले. मला पुढेही चांगला खेळ सुरू ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त सामने जिंकायचे आहेत, असे श्रीकांत म्हणाला.

- Advertisement -

श्रीकांतचा मलेशिया ओपनमधील पहिला सामना बुधवारी होणार आहे. आधी त्याचा मलेशियाचा महान खेळाडू ली चॉन्ग वे सोबत सामना होणार होता. मात्र, त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे श्रीकांतचा सामना पात्रता फेरीत जिंकणार्‍या एका खेळाडूशी होईल.

समीर वर्मा पहिल्याच फेरीत गारद

- Advertisement -

भारताच्या समीर वर्माला मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या चीनच्या शी युक्कीने अटीतटीच्या सामन्यात २०-२२, २३-२१, १२-२१ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि शिक्की रेड्डी यांनी मात्र या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. त्यांनी पहिल्या फेरीत आयर्लंडच्या सॅम मगी आणि क्लोई मगी या जोडीला २२-२०, २४-२२ असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -