सब ज्युनियर जिल्हास्तरीय कबड्डी

दुर्गामाता स्पोर्ट्स क्लब विजेते

दुर्गामाता स्पोर्ट्स क्लबने सिद्धप्रभा फाऊंडेशन या संघाचा ३७-२८ असा नऊ गुणांनी पराभव करत अमरहिंद मंडळ आयोजित सब ज्युनियर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दुर्गामाता स्पोर्ट्स क्लबने सिद्धप्रभा फाऊंडेशनवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे मध्यंतराला त्यांच्याकडे १५-८ अशी ७ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतरही दुर्गामाताने दमदार खेळ करत हा सामना ३७-२७ असा जिंकला.

दुर्गामाताकडून करण कदम याने चढाईत ९ तर पकडीत ३ गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला. त्याला प्रथमेश पलांडेने चढाईत १० गुण मिळवत तर आशिष पालेने पकडीत ४ गुण मिळवत चांगली साथ दिली. सिद्धप्रभाकडून ओंकार ढवळेने चढाईत ३ गुण आणि पकडीत ३ गुण मिळवत तर ओमकार पवारने चढाईत ६ गुण मिळवत हा सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आपल्या संघाला सामना जिंकवून देण्यात अपयश आले.