कोरोनानंतर ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेने होणार सुरुवात

mcg ground

कोरोना विषाणूमुळे मागील तीन महिन्यांपासून बंद असलेले क्रिकेट आता हळूहळू मैदानात परतण्याची तयारी करत आहे. गेल्या महिन्यात विन्सी प्रीमियर लीगसारख्या छोट्या स्पर्धा सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्येही स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात होणार आहे. देशांतर्गत टी-२० स्पर्धा ‘सीडीयू टॉप एंड टी-२०’ स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या डार्विन येथे खेळवली जाणार आहे.

क्रिकेट डॉट कॉम एयूच्या वृत्तानुसार ही स्थानिक स्पर्धा शनिवार ६ जून ते सोमवार ८ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यामध्ये डार्विन प्रीमियर ग्रेडच्या ७ क्लबमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यामधील आठवा संघ इनव्हिटेशनल इलेव्हन (आमंत्रित संघ) असेल. हे सामने मारा क्रिकेट मैदान, गार्डन्स ओव्हल आणि काजेलिस ओव्हल येथे खेळवले जाणार आहेत. उपांत्य आणि अंतिम सामने ८ जून रोजी खेळविण्यात येणार आहेत. सर्व सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता आणि दुपारी २.३० वाजता सुरू होतील. चार्ल्स डार्विन युनिव्हर्सिटी आणि एनटी क्रिकेट यांनी सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी करार केला आहे. त्याअंतर्गत सेमीफायनल आणि अंतिम सामन्यांसह काही सामने मायक्रिकेटच्या फेसबुक पेजवर प्रसारित केले जातील.

ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम जाहीर

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यात ऑस्ट्रलियात खेळवल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं. ऑस्ट्रलिया ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेपासून क्रिकेट सुरू करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या डोमेस्टिक उन्हाळ्यात भारतीय संघाच्या दौर्‍याचाही समावेश आहे. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ३ टी-२० मालिकेसह २ वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा आहे. तर सर्वांचं लक्ष डिसेंबर आणि जानेवारीत होणार्‍या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेवर आहे.


हेही वाचा – विराट कोहली, रोहितमध्ये तुलना होऊ शकत नाही!