घरक्रीडाMirabai Chanu : अपयशानंतरचे यश!

Mirabai Chanu : अपयशानंतरचे यश!

Subscribe

मीराबाईने २०१६ रिओ ऑलिम्पिकनंतर दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक करावे तितके थोडेच!   

अपयशानंतरचे यश खूप खास असते. प्रत्येक अपयशात शिकण्याची संधी असते, केवळ इच्छा पाहिजे, असे म्हटले जाते. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये अपयश आले. परंतु, या अपयशातून तिने धडा घेतला. तिने हार न मानता, खचून न जाता, स्वतःमध्ये सुधारणा केली. खूप मेहनत घेतली. याचेच फळ आता तिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले आहे. मीराबाईने या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी भारताला पहिले पदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी मीराबाई ही भारताची एकमेव वेटलिफ्टर होती. त्यामुळे देशवासियांना तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. या अपेक्षा पूर्ण करण्यात तिला यश आले.

मीराबाईने २०१४ सालच्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जगाला स्वतःची ओळख करून दिली होती. त्यानंतर तिला २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यातही यश आले. या स्पर्धांमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. परंतु, ती चांगली कामगिरी करू शकली नाही. क्लीन आणि जर्कमधील तिन्ही प्रयत्नांत ती अपयशी ठरली. तिला वजन उचलता आले नाही. त्यामुळे तिला ‘खाली हाथ’च मायदेशी परतावे लागले. तिच्या या निराशाजनक कामगिरीची बरीच चर्चा झाली. तिच्यावर टीकाही झाली. मात्र, या पराभवानंतर तिने अधिक जिद्दीने खेळ करण्यास सुरुवात केली. तिने तिच्या खेळात आणि तंत्रात काहीसा बदल केला. याचा तिला फायदा झाला.

- Advertisement -

मीराबाईने २०१७ सालची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, तसेच २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली. तसेच यावर्षी झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईने क्लीन आणि जर्कमध्ये ११९ किलोचे वजन उचलत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या स्पर्धेत तिने क्लीन आणि जर्कमध्ये ११९ किलो, तर स्नॅचमध्ये ८६ किलोचे वजन उचलत कांस्यपदक आपल्या नावे केले. परंतु, विशेषतः ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करणार, याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष होते.

तिने टोकियो ऑलिम्पिकसाठी विशेष तयारी केली. ती १ मे रोजी अमेरिकेतील सेंट लुईससाठी रवाना झाली. तिथे मीराबाईने स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक डॉ. अ‍ॅरॉन हॉर्सचीग यांच्या मार्गदर्शनात सराव केला. तसेच तिला सातत्याने खांद्याची दुखापत होत असल्याने त्यावरही तिने उपचार घेतले. अमेरिकेतून तिने थेट टोकियो गाठले. ऑलिम्पिकसाठी टोकियोमध्ये दाखल होणारी ती भारताची पहिली खेळाडू होती. ऑलिम्पिकमध्ये मीराबाईने महिलांच्या ४९ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये दोन प्रयत्नांत ८४ आणि ८७ किलो, तर क्लीन आणि जर्कमध्ये दोन प्रयत्नांत ११० आणि ११५ किलो असे वजन उचलले. अखेर तिने एकूण २०२ किलो (८७+११५) अशा वजनांची नोंद करत रौप्यपदकाची कमाई केली.

- Advertisement -

ऑलिम्पिकमधील वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावणारी ती कर्णम मल्लेश्वरीनंतर केवळ दुसरी वेटलिफ्टर ठरली. भारतात ऑलिम्पिकबाबत आणि वेटलिफ्टिंग या खेळाबाबत चर्चा करताना आजही कर्णम मल्लेश्वरीचे नाव आवर्जून घेतले जाते. आता मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करत मल्लेश्वरीच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. तिच्या या कामगिरीचे आणि तिने २०१६ रिओ ऑलिम्पिकनंतर दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक करावे तितके थोडेच!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -