घरक्रीडाWorld Cup 2019 : बापरे! हा तर विक्रमांचा सामना!

World Cup 2019 : बापरे! हा तर विक्रमांचा सामना!

Subscribe

मंगळवारी इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान हा वर्ल्डकपमधला सामना झाला. हा सामना वर्ल्डकपपेक्षाही विक्रमांचा सामनाच ठरला!

आपल्यापैकी अनेकांनी मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर क्रिकेटचा गेम खेळला असेल. त्यातही बॅटिंगमध्ये मजा यावी म्हणून इझी मोड सिलेक्ट करून आपण दणादण बॉलरला सिक्सर, फोर मारतो. बहुधा मंगळवारी इंग्लंडचा बॅट्समन इऑन मॉर्गन अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तशाच काहीशा मूडमध्ये आला होता. कारण अफगाणिस्तानच्या बॉलर्सची त्यानं यथेच्छ धुलाई करत अक्षरश: पिसं काढली आहेत. त्यामुळे त्याच्या एकट्याच्या तुफान फटकेबाजीमुळे हा सामना ‘विक्रमांचा सामना’ म्हणूनच ओळखला जाणार आहे. कारण इऑन मॉर्गनने मैदानावर केलेल्या फटकेबाजीमुळे फक्त अफगाणिस्तानच्या खेळाडूंचेच नाही, तर इंग्लंडच्या खेळाडूंचे आणि मैदानावरच्या प्रेक्षकांचेही डोळे फिरले असतील!

इऑन मॉर्गनचा धुमाकूळ!

गुणतालिकेत तळाशी असलेल्या अफगाणिस्तानची मंगळवारी बलाढ्य इंग्लंडशी गाठ पडली. आणि रात्रीचं भयानक स्वप्न ठरावं अशी बॅटिंग अफगाणिस्तानच्या बॉलर्सला पाहायला मिळाली. इंग्लंडचा स्कोअर २ विकेटवर १६४ असताना इऑन मॉर्गन खेळायला आला आणि पुढच्या २ तासांमध्ये त्यानं पीचवर अक्षरश: धुमाकूळ घातला. फक्त ७७ बॉलमध्ये इऑननं तब्बल १४८ धावा फटकावल्या. फटकावल्या म्हणजे अक्षरश: फटकावल्याच! या खेळीमध्ये त्यानं तब्बल १७ षटकार आणि फक्त ४ चौकार लगावले. आणि तिथेच सामन्याचा पहिला विक्रम नोंदवला गेला.

- Advertisement -

इऑन मॉर्गनचे सर्वाधिक षटकार

एका वन डे मॅचमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम इऑननं आपल्या नावावर केला आहे. याआधी एका सामन्यात १६ षटकार खेचण्याचा विक्रम रोहीत शर्मा(भारत), ख्रिस गेल(वेस्ट इंडिज) आणि ए. बी. डिव्हिलियर्स(द. आफ्रिका) या तिंघांच्या नावावर संयुक्तपणे होता.


धोनीबद्दल ही बातमी वाचलीत का? – वर्ल्डकपनंतर पोलखोल करणार!

इंग्लंडचा सर्वात वेगवान शतकवीर

इऑनचा दुसरा विक्रम त्याच्या शतकामध्ये झाला. इंग्लंडकडून वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत मॉर्गन पहिला ठरला आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात वेगात शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मॉर्गनचं हे शतक चौथ्या स्थानावर आहे. शिवाय एक कॅप्टन म्हणून वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा मॉर्गन दुसरा कॅप्टन ठरला आहे.

- Advertisement -

राशीदसाठी सामना एक दु:स्वप्न!

राशीद खानसाठी हा सामना एक दु:स्वप्नच ठरला. आयपीएलमध्ये सर्वात कमी इकॉनॉमी रेटने बॉलिंग करणाऱ्या राशीद खानने या एकाच मॅचमध्ये तब्बल ११० रन दिले आहेत. वर्ल्डकपच्या इतिहासात हे कोणत्याही बॉलरने दिलेले सर्वाधिक रन आहेत. याआधी न्यूझीलंडच्या मार्टिंन स्नेडनने इंग्लंडच्याच विरोधात १९८३च्या वर्ल्डकपमध्ये १२ ओव्हरमध्ये १०५ रन दिले होते. याशिवाय राशीद एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात १०० हून अधिक रन देणारा पहिला स्पीनर ठरला आहे. यामध्ये राशीदच्या बॉलिंगवर इंग्लंडच्या बॅट्समन्सनी ११ षटकार आणि ३ चौकार वसूल केले आहेत. कोणत्याही बॉलरला कोणत्याही एकदिवसीय मॅचमध्ये आत्तापर्यंत पडलेले हे सर्वाधित षटकार आहेत. राशीदचा इकॉनॉमी रेटही आत्तापर्यंत ९ ओव्हर टाकलेल्या कुणाही बॉलरपेक्षा जास्त म्हणजेच १२.२२ होता. त्याच्यानंतर झिम्बाब्वेच्या ब्रायन व्हिटोरीच्या ११.६६ इकॉनॉमी रेटचा क्रमांक लागतो.


हेही वाचा – …म्हणून इंग्लंडला मिळाले वर्ल्डकपचे यजमानपद

इंग्लंडच्या बॅट्समन्सनी ठोकले सर्वाधिक षटकार!

त्यापुढचा विक्रम नोंदवला गेला तो इंग्लंडच्या टीमनं ठोकलेल्या षटकारांचा. आत्तापर्यंत कोणत्याही टीमने एकाच एकदिवसीय सामन्यात फटकावलेल्या एकूण षटकारांच्या यादीमध्ये इंग्लंडचं नाव सर्वात वर आहे. या मॅचमध्ये इंग्लंडच्या बॅटिंगने एकूण २५ षटकार ठोकले आहेत. याशिवाय ३९७ हा इंग्लंडचा वर्ल्डकप सामन्यांमधला सर्वाधिक स्कोअर ठरल आहे. याआधी बांग्लादेशविरुद्ध यंदाच्याच वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने ३८६ धावा ठोकल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -