घरक्रीडामेरी कोमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मेरी कोमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Subscribe

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा

भारताची आघाडीची बॉक्सर आणि सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कोमने (५१ किलो) जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरीने थायलंडच्या जुतामास जित्पोंगला ५-० असे पराभूत केले. स्विटी बुराचे (७५ किलो) मात्र यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

उप-उपांत्यपूर्व फेरीत जित्पोंगने आक्रमक खेळ करत अनुभवी मेरीला चांगली झुंज दिली. मात्र, तिला फारसे पंचेस मारता आले नाहीत आणि त्यामुळे तिला एकही गुण मिळवता आला नाही. तिसर्‍या सीडेड मेरीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. त्यामुळे उप-उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याच्या सुरुवातीला मेरीला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. परंतु, प्रतिस्पर्धीच्या खेळाचा अंदाज आल्यानंतर मेरीने अप्रतिम प्रतिहल्ला करत हा सामना जिंकला. याआधी जागतिक स्पर्धेत सहावेळा सुवर्णपदक जिंकणार्‍या मेरीचा ५१ किलो वजनी गटात पहिल्यांदा सुवर्ण मिळवण्याचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

दुसरीकडे जागतिक स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेत्या स्विटी बुराचे (७५ किलो) यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उप-उपांत्यपूर्व फेरीत तिला दुसर्‍या सीडेड वेल्सच्या लॉरेन प्राईसने पराभूत केले. युरोपियन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या लॉरेनने मागील जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत तिला सुवर्णपदक जिंकण्यात यश आले होते. त्यामुळे बुराविरुद्धच्या सामन्यात तिचे पारडे जड मानले जात होते. बुराने तिला चांगली झुंज दिली, पण तिला हा सामना जिंकता आला नाही. बुराने हा सामना १-३ असा गमावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -