घरठाणेपट वाढवा उपक्रमांअंतर्गत 642 विद्यार्थ्यांना पालिका शाळांमध्ये प्रवेश

पट वाढवा उपक्रमांअंतर्गत 642 विद्यार्थ्यांना पालिका शाळांमध्ये प्रवेश

Subscribe

तत्कालीन आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून प्रारंभ झालेल्या गुढीपाडवा, शालेय पट वाढवा या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्षही, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळामध्ये उत्साहात साजरे करण्यात आले. जरीमरी माता प्राथमिक विद्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक 18 तिसगाव या शाळेमध्ये या उपक्रमाचे आयोजन गुढीपाडव्याला अतिशय नावीन्यपूर्ण रीतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा व पालकांचा सहभाग उल्लेखनीय होता. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शाळेचा पट वाढवणे व नवीन प्रवेश दाखल करणे हा होता. कार्यक्रमास उपस्थित शिक्षण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे व प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या हस्ते तिसगाव शाळेत एकूण 19 विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र भरून प्रवेश देण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या 59 शाळांमध्ये एकाच दिवशी 642 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अतिशय सुंदर असे स्वरूप लेझीम आणि संचलनाद्वारे दाखवून दिले, पाहुण्यांचे स्वागत केले. मराठी नववर्षाचे स्वागत करत असताना शाळेतील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने पुस्तकांची गुढी उभारली होती. पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृतता आणि शाळेविषयी आत्मीयता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व शालेय पट वाढीच्या संदर्भातील गीतांचा समावेश करण्यात आला होता. उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळेच्या प्रगती विषयी कौतुक व्यक्त केले. जरीमरी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व उपायुक्त स्वाती देशपांडे यांचे आभार व्यक्त करून आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून संबंधित अधिकारी, शिक्षकांच्या विविध कार्यक्रमांना हजर राहून मार्गदर्शन करतात याबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षण स्वाती देशपांडे, प्रशासन अधिकारी विजय सरकटे, 5 ड प्रभागाचे सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप, सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यक्रमाधिकारी अर्चना जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -