घरठाणेशहरातील रस्त्यांची कामे ३० जूननंतर बंद म्हणजे बंद - आयुक्तांची सक्त ताकीद

शहरातील रस्त्यांची कामे ३० जूननंतर बंद म्हणजे बंद – आयुक्तांची सक्त ताकीद

Subscribe

सर्व यंत्रणांनी 24 x 7  सतर्क रहावे - आयुक्‌त अभिजीत बांगर

महापालिकेने ६०५ कोटीच्या पॅकेजअंतर्गत हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे जवळपास ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. सद्यस्थितीत सुरु असलेली कामे ३० जूनपर्यत संपवावीत. १ जुलैपासून कुठल्याही परिस्थितीत रस्त्यांची कामे चालू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी उर्वरित कामे पावसाळा कालावधीनंतर पूर्ण करण्यात यावी. पावसाळयाच्या दरम्यान मुळातच वाहतूकीचा वेग कमी होतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्यात रस्त्यांची कामे सुरू असतील तर त्यामुळे वाहतूक वळविणे (Diversion) आणि वाहतुकीस अडथळा  (obstruction) निर्माण होवून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर १ जुलैनंतर  शहरात एकाही रस्त्याचे काम सुरू नसावे, सर्व सुरू असणारी कामे पूर्ण करुन अथवा या रस्त्यांवरुन वाहतूक सुरू राहू शकेल या स्थितीमध्ये आणून संपूर्ण शहरात वाहतूक सुरळीत राहिल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये १ जुलैनंतर रस्त्याचे काम चालू आहे, रस्ता खणलेला आहे, काँक्रिट भरुन क्युरिंगसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे, पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ता खणून तसाच सोडून देण्यात आलेला आहे या बाबी चालणार नाहीत अशी सक्त ताकीद बैठकीत सर्व कार्यकारी अभियंत्यांनी देण्यात आली.

शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी खड्डेमुक्त पद्धतीने प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त इतर रस्तयांवर जर खड्डा पडला तर तो  यंत्रणेच्या त्वरीत निदर्शनास येणे आवश्यक आहे. त्यासाठी शाखा अभियत्यांपासून ते नगर अभियंता पर्यंत संपूर्ण यंत्रणा पुढील चार महिने त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरत राहतील. एखाद्या रस्त्यावर खड्डा पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे हे निदर्शनास आल्यास त्वरीत त्या रस्त्यांची डागडुजी अत्यंत तातडीने व प्राधान्याने होईल याची दक्षता घ्यावी. रस्त्याचा पृष्ठभाग उखडला जात आहे किंवा कसे यावर यंत्रणेने लक्ष ठेवून तर असावेच तसेच  नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून येणारा फिडबॅक आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असून त्यावर बारा तासांच्या आत कार्यवाही होईल हे देखील सुनिश्चित करावे. कोणत्याही परिस्थितीत बारा तासांच्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये  चोवीसही तास आणि सातही दिवस सर्व यंत्रणा कार्यरत राहिल याची दक्षता घ्यावी. ‘सुट्टी आहे किंवा रात्र आहे यामुळे दुरूस्तीचे काम उद्या करतो’ अशी सबब खपवून घेतली जाणार नाही. तक्रार आल्यानंतर त्यावर त्वरीत कार्यवाही होणे अपेक्षित आहे असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

- Advertisement -

शहरामधील काही रस्ते एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्‌ल्यूडी इ. यंत्रणांच्या ताब्यात आहेत, अशा सर्व रस्त्यांवर जर खड्डा दिसला तर त्या यंत्रणेने रस्त्यांची दुरूस्ती करण्याची वाट न बघता महानगरपालिकेने आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने दुरूस्ती केली जाईल हे सुनिश्चित करावे. रस्ता कोणाच्याही मालकीचा असो शेवटी नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते देणे ही सर्व यंत्रणांची सामुदायिक जबाबदारी असून त्यामध्ये महानगरपालिकेने प्रमुख भूमिका निभावणे अपेक्षित आहे याची जाणीव ठेवावी असेही आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले. ठाणे शहरातील पावसाळी गटार व्यवस्था ही 50 मि.मी. पावसापर्यत पाण्याचा निचरा करु शकेल अशा पध्दतीने बनविल्याने एका तासात 50 मि.मी पेक्षा जास्त पाऊस  झाला तर शहरात काही ठिकाणी पाणी साचायला सुरूवात होते.

रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी पाणी खड्डे पडण्याची शक्यता अनेक पटींने वाढते, त्यामुळे पाणी साचलेल्या प्रत्येक ठिकाणी त्वरीत त्या जागेवर जावून  पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यामध्ये अभियंता विभाग, स्वच्छता विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी पराकोटीचा समन्वय ठेवणे गरजेचे आहे. तसेच नाल्याचे मुखावर कचरा साचला असेल तर अशा सर्व ठिकाणांची साफसफाई करुन कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी. दरवर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी मागच्या वर्षी पेक्षा दुप्पट म्हणजे एकूण  58 पंप उपलब्ध केले आहेत. तसेच मोक्याची ठिकाणी अतिवृष्टीच्या वेळी जर वीजप्रवाह खंडित झाला तर पंप सुरू रहावा यासाठी बॅकअपची व्यवस्था करण्यात यावी असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले. प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर पुरेसे मनुष्यबळ पाण्याचा निचरा करण्यासाठी चोवीसही तास उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी. तसेच एक टिम मुख्यालयात उपलब्ध ठेवण्यात यावी. तातडीची गरज भासल्यास या टिमचा वापर जावू शकेल अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या.

- Advertisement -

चेंबर्सवरील झाकणे तातडीने बसवा
सर्व शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी आपापल्या विभागात पायी फिरून मशीनहोलची झाकणे सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करावी व त्यांची दुरूस्ती  त्वरीत होईल याची दक्षता घ्यावी, कोणतीही दुर्घटना खपवून घेतली जाणार नाही असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

मोठया भरतीच्या वेळी सजग रहा
संपूर्ण पावसाळा कालावधीत चार मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे, याबाबतचा सविस्तर तपशील प्रसिद्ध केला असून जुलै 2023 मध्ये  दिनांक 2 ते 8 जुलै 2023, 17 ते 22 जुलै व 31 जुलै तर ऑगस्ट 2023 मध्ये 1 ते 6 ऑगस्ट, 16 ते 20 ऑगस्ट आणि 29 ते 31 ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात 1 ते 4 सप्टेंबर, 15 व 16 सप्टेंबर, 27 ते 30 सप्टेंबर अशा तारखा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डने प्रसिद्ध केल्या आहेत. या दिवशी जर अतिवृष्टी झाली तर सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर वाढते त्यामुळे या कालावधीत संपूर्ण यंत्रणा ही हायॲलर्टवर राहील हे सुनिश्चित करावे असेही आयुक्तांनी नमूद केले

झाडांच्या छाटलेल्या रस्त्यावरील फांद्या उचलाव्यात
पावसाळयाच्या दृष्टीने झाडांच्या फांद्या छाटणीचे काम सुरू आहे. परंतु छाटणीनंतर रस्त्यावर टाकलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने उचलाव्यात, रस्त्यावर फांद्या पडून राहिल्याने पावसात त्या कुजण्याचे प्रकार घडून रस्ता ही खराब होतो कोणत्याही परिस्थितीत बारा तासापेक्षा जास्त काळ या फांद्या पडून राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता विकास ढोले, रामदास शिंदे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -