घरठाणेठाण्यात कंत्राटी डॉक्टराला मारहाण

ठाण्यात कंत्राटी डॉक्टराला मारहाण

Subscribe

ठामपा वैद्यकीय अधिकारी असोसिएशन आक्रमक, मारहाण करणार्‍यास तात्काळ अटक करण्याची मागणी, अन्यथा आरोग्य केंद्राच्या ओपीडी, लसीकरण बंद करण्याचा इशारा

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महापालिकेच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट केंद्रावर देखील गर्दी होऊ लागली आहे. रविवारी लोकमान्य टिळक रुग्णालयात अशाच प्रकारे काम सांभाळणार्‍या एका कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍याला मनसेच्या महेश कदम यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय अधिकार्‍याला मारहाण करणे हा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी ठाणे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी असोसिएशन सोमवारी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेत मागणी केली. परंतु योग्य ते पाऊल उचलले गेले नाही तर शहरातील लसीकरण केंद्र आणि आरोग्य केंद्रातील ओपीडी मंगळवारपासून बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला.

महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना निवेदनाद्वारे या घटनेची माहिती दिली. तसेच, मारहाण करणार्‍यांना अटक झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी सुरक्षा व्यवस्था देण्याबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

वर्तकनगर भागातील लोकमान्य टिळक रुग्णालयात रविवारी अ‍ॅन्टीजेन टेस्टचे काम सुरू होते. यावेळी डॉ. निगम हे अँटीजेन टेस्टिंग सेंटरचे कामकाज पाहत होते. त्यावेळेस एक महिला आणि त्यांचा मुलगा तेथे टेस्टसाठी आले होते. त्यांची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर त्यांना तुम्हाला कोणता आजार आहे का? अशी विचारणा देखील त्यांनी केली. त्यानुसार त्यांनी जुना आजार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना भाईंदरापाडा येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्याचा सल्ला दिला. तसेच त्याठिकाणी बोलणे करून त्यानुसार त्यांना सांगण्यात आले. परंतु त्यानंतर दुपारच्या सुमारास मनसेचे महेश कदम यांचा फोन आला. त्यांनी महापालिकेच्या ग्लोबल सेंटरमध्ये का रुग्णाला दाखल करीत नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी फोनवरच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे डॉ. निगम यांनी फोन ठेवला असता, काही वेळातच कदम आणि त्यांचा एक मित्र त्याठिकाणी आले आणि त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे निगम यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान आता ठाणे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी असोसिएशनच्या वतीने महेश कदम यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे. कोरोना कालावधीत सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला नुसतेच कोरोना वॉरियर वगैरे संबोधून अशा लोकांचा मार खायला सोडले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या सर्व राजकीय पक्षांच्या तथाकथित समाजसेवकांना अशा प्रकारचे गुन्हेगारी वर्तन करून देखील आजवर कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही. त्यामुळे सर्वच आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनोबल खचून गेले आहे.

- Advertisement -

त्यातही दमदाटी आणि आरडाओरडा केला की हवे ते पदरात पाडून घेता येते असा या वर्गाचा समज झालेला आहे. त्यामुळे आता अशा प्रकारे वर्तन केलेल्या प्रत्येक व्यक्तीस तातडीने अटक करून जास्तीत जास्त शिक्षा होईल असे प्रशासनाने पाहिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे कदम यांच्यावर कर्तव्यावरील शासकीय अधिकार्‍याला मारहाण करणे हा अजामीनपात्र गुन्हा दाखल करून तातडीने २४ तासांच्या आत अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. परंतु तात्काळ अटक झाली नाही तर मंगळवारपासून आरोग्य केंद्रातील ओपीडी आणि लसीकरण केंद्र बंद राहतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -