कळवा रुग्णालयात आजपासून मोफत औषध उपलब्ध

आयुक्तांच्या आश्वासनानंतर मनसेची माहिती

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना औषध बाहेरून घ्यावे लागते ही बाब उघडकीस आणून सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनाबाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली. याचदरम्यान मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मोफत औषध देण्याची मागणी लावून धरली. झालेल्या चर्चेनंतर आयुक्तांनी मनसे शिष्टमंडळाला मंगळवारपासून मोफत उपलब्ध करून दिले जातील असे आश्वासन दिले.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून रुग्ण रोज उपचारासाठी येत असतात. या रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना औषध मात्र बाहेरून विकत आणण्यासाठी सांगितले जाते. तसेच शस्त्रक्रियेसाठी ही पैसे घेत जात असल्याचा आरोप यापूर्वी मनसेच्या वतीने केला होता. याला वाचा फोडण्यासाठी मनसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यासाठी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत आयुक्त शर्मा यांनी मंगळवारपासून कळवा येथील रुग्णालयात सर्वप्रकारची औषध मोफत उपलब्ध होतील असं आश्वासन दिल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.