ठाणेकरांसाठी खूशखबर! बारवी धरण काठोकाठ भरलं, पाण्याची चिंता मिटली

बदलापूर – ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण (Baravi Dam) अखेर भरले. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास धरणाने आपली ३४० दशलक्ष घनमीटरची पाणी पातळी ओलांडली. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची (Thane District) पाणी चिंता मिटली आहे. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. (Good News for Thanekar, baravi dam full)

हेही वाचा – मिरा-भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण गुरुवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले. बारावी धरणाची उंची ७२.६० मीटर इतकी आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धरणाने ही उंची गाठली त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाणी चिंता मिटली आहे. बारवी धरणाच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिका, तसेच स्टेम प्राधिकरण औद्योगिक वसाहती तसेच ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा केला जातो. मे महिन्याच्या शेवटी बारवी धरणाने तळ गाठला होता. तर जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने ठाणे जिल्ह्यावरचे पाणी संकट गडद झाले होते. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाने धरण क्षेत्रात आणि परिसरात जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे बारवी धरणाच्या पाणी पातळीत मोठी झाली होती.

हेही वाचा – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित; 14 ऑगस्टला ठाणे महापालिकेची मॅरेथॉन स्पर्धा

मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पावसाने उसंत घेतली त्यामुळे धरण भरण्याचा वेग मंदावला होता. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सकाळी धरणात ९८ टक्के इतका पाणीसाठा होता. तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. बारवी धरण भरल्याने जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास धरणाचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येणार आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावाने देखील सतर्क राहणे गरजेचे आहे.