स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार, अजित पवारांची माहिती

स्थानिक निवडणुका आघाडी एकत्र लढविणार आहे. याबाबत माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

ajit pawar

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविल्या जातील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढण्याला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय जिल्हा स्तरावर होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी रात्री मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती अजित पवार यांनी आज माध्यमांना दिली. या बैठकीत आगामी निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी यावरही चर्चा झाल्याचे पवार म्हणाले. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील, असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा प्रयत्न असून याबाबत तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर निर्णय घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणेशोत्सवानंतर शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.