पाण्यासाठी टँकरवर झुंबड

 १७७ गावपाड्यांना ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

tankar

उन्हाच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या तीव्रतेमुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. नद्या, ओहळामध्ये पाण्याचा खडखडाट झाला असून विहिरी, हातपंपाचे स्रोतही आटल्याने तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील महिला भगिनींसह आबालवृद्धांना घोटभर पाण्यासाठी टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. उन्हाच्या भीषण तडाख्यात लोकसंख्येनुसार माणशी वीस लिटर याप्रमाणे टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यात तहान भागत नसल्याने टँकरवर पाण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत असल्याने पाणीपुरवठ्यात वाढ करा अशी मागणी केली जात आहे. दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव पाड्यांमध्ये कमालीची वाढ होत असून आजमितीस १७७ गावपाड्यांना ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणारी तानसा, भातसा, वैतरणा धरणे शहापुर तालुक्यात असूनही तालुकवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोळ्यांना दिसतंय पण प्यायला मिळत नाही अशी स्थिती तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाची झाली आहे. तालुक्यात किमान ७०० विहिरी आणि ९०० हातपंप असून टंचाईग्रस्त भागातील विहिरी, हातपंपात पाण्याचा खडखडाट झाला आहे. यामुळे पाण्यासाठी जीव व्याकुळ झालेल्या ग्रामस्थ महिला भगिनींना टँकरची वाट बघण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यामुळे टँकर आला की पाण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते. त्यातही शासनाच्या जुन्या नियमानुसार माणशी वीस लिटर याप्रमाणे टँकर ने होणारा पाणीपुरवठा या रखरखीत उन्हात पुरेसा नसल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या महिलांकडून जलजीवन मिशन योजनेप्रमाणे माणशी किमान ५० लिटर पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे. टंचाईग्रस्त भागातील दुधदुभत्या व मोकाट जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

तालुक्यातील लाहे, सावरोली, आटगाव, जांभुळवाड, खैरा, कराडे, मसमालपाडा, भावार्थेपाडा, ओहोळाचीवाडी या नवीन गावपाड्यांना यावर्षी प्रथमच पाणीपुरवठा करण्यात येत असून आता ३७ गावे व १४० पाड्यांना तब्बल ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर तालुक्यातील रानविहिर, साखरपाडा, मधलीवाडी, गरेलपाडा, लाखेवाडी, मुसईवाडी, कृष्णाचीवाडी या गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. मोठी धरणे असलेल्या शहापुर तालुक्याची पाणीटंचाई कधी संपुष्टात येणार असा गहन प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.