धक्कादायक! मित्राची हत्या करून मृतदेह खाडीत फेकणाऱ्याला अटक

murder
हत्या

गणपतीच्या आरतीला मामाकडे गेलेल्या २० वर्षीय तरुणाची मित्रानेच हत्या करून मृतदेह वसईच्या खाडीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मित्राला मंगळवारी अटक केली असून त्याने दिलेल्या माहितीवरून वसई खाडीतून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.

अक्षय डाकी (वय २०) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा आई वडिलांसह ठाण्यातील वाघबीळ गाव या ठिकाणी राहण्यास होता. अक्षयचे वडील रामचंद्र हे रिक्षाचालक आहेत. ३ सप्टेंबर रोजी अक्षय हा मामाकडे गणपतीच्या आरतीला जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नसल्यामुळे वडिलांडी कासारवडवली पोलीस ठाण्यात अक्षयची हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अक्षयचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. मात्र तो मिळून येत नसल्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. अक्षयच्या गळ्यात ४ तोळे वजनाची सोनसाखळी होती. त्यामुळे अधिकच चिंता वाढली होती. अक्षयचा शोध घेत असताना त्याची स्कुटी बामनाली पाडा, पानखंडा रोड येथील एका झाडाखाली मिळून आली आली होती मात्र अक्षयचा काही थांगपत्ता लागत नव्हता. अक्षय नेहमी बामनाली पाडा, पानखंडा रोड येथे राहणाऱ्या धनराज तरुडे या मित्राला भेटायला येत होता, अशी माहिती त्याच्या घरच्यांना कळली होती. घरच्यांनी धनराजकडे अक्षय बाबत चौकशी केली मात्र त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. त्यातच त्याच परिसरात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाने धनराज हा ४ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता माझ्या रिक्षातून एका गोणी घेऊन वसई खाडी येथे आला होता. गोणीत काय आहे म्हणून रिक्षाचालकाने विचारले असता कुत्रा मेला आहे त्याला खाडीत टाकायला जायचे आहे, असे त्याने सांगितले होते, अशी माहिती रिक्षाचालकाने अक्षयच्या वडिलांना दिली.

वडिलांनी कासारवडवली पोलिसांना माहिती दिली असता पोलीसानी धनराजला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी धनराजच्या सांगण्यावरून अक्षयचा मृतदेह खाडीतून ताब्यात घेतला असून याप्रकरणी धनराज तारुडे याला अक्षयच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. मात्र अक्षयची हत्या का केली याबाबत अद्याप धनराजने माहिती दिली नसल्यची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. पोलिसांना अद्याप अक्षयच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच मोबाईल फोन मिळून न आल्यामुळे पैशासाठी अक्षयची हत्या केली असावी, अशी शक्यता पोलीस वर्तवत असून या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अखेर पोलिसांना धनराजवर संशय येताच पोल्सीणी धनराज तारुडे याला ताब्यात घेऊन त्याचाकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत अक्षयची धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह वसई खंडित टाकल्याची कबुली पोलिसाना दिली.

हेही वाचा –

‘कंगनाने मुंबईत येऊन शिवसेनेचं नाक कापलं’, राणेंचा हल्ला