चप्पल आणि बाप बदलणाऱ्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत

शिवसेनेचा परांजपेंवर जोरदार पलटवार

 दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे योगदान विकास कामांसाठी सर्वश्रुत आहेत. मात्र प्रकाश परांजपे  यांच्या दुख:द निधनानंतर त्यांची चप्पल त्यांच्या मुलाला घालायला दिली होती. पण आपल्या पित्याची चप्पल पुत्राच्या पायात बसली नाहीच, पण आपल्याच पित्याच्या चपलेचा अवमान करून दुसऱ्याची चप्पल डोक्यावर घेणाऱ्या या पुत्राला जनतेने दोन वेळा घरी बसविले याचे भान त्यांनी आता ठेवणे गरजेचे आहे, असा टोला शिवसेनेने आनंद परांजपे यांना लगावला.
खारेगाव उड्डाणपुलाचा कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे आम्ही शांत होतो. पण वारंवार पत्रकार परिषदा घेऊन वादाची ठिणगी जर कोणी लावणार असाल तर आग भडकणारच आहे, आणि कलयुगातील कालींना पुरण्यासाठी या कलीयुगात नारदाची गरज आहे, असे शिवसेनेन स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत आनंद परांजपे यांनी बापाची चप्पल मुलाला आली म्हणजे अक्कल येत नाही असे विधान केले, या विधानाचा समाचार घेताना शिवसनेने म्हटले आहे कि माजी तथा दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांनी विकास कामे केली. मात्र प्रकाश परांजपे यांच्या दु:खद  निधनानंतर शिवसनेने जराही विलंब न लावता परांजपे यांच्या पायातील चप्पल त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांना घालायला दिली. शिवसैनिकांनी आनंद परांजपे यांना खासदार केले.
मात्र शिवसैनिकांनी झिजवलेल्या चप्पलांचा विचार तर सोडाच, या आनंद परांजपे यांच्या पायात त्यांच्या वडिलांची चप्पल सुद्धा बसली नाही. आणि ही चप्पल कशी टिकवावी यांची अक्कल न आल्यामुळेच ऐन वेळी इतर पक्षाची चप्पल आपल्या पायात घालण्यात आणि बाप बदलण्याची वेळ आनंद परांजपे यांच्यावर आली, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे चप्पला आणि बाप यांच्या उपमा आणि सल्ले देण्याच्या फंदात परांजपे यांनी पडू नये, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

उड्डाणपूल कोणी बांधला हे जनतेला माहित
खारेगावचा उड्डाणपूल कोणी बांधला हे आता संपूर्ण मतदार संघातील जनतेला माहित झाले आहे.  पत्रकार परिषदेत परांजपे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील काही प्रकल्पाबाबत प्रश्न चिन्ह उभे केले. या मुद्याचाही समाचार घेताना विकासकामांमुळेच कल्याण लोकसभा क्षेत्रात डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे नाव घराघरात पोहचले आहे, असे शिवसेनेने स्पष्ट केले. स्मार्ट सिटी म्हणजे काय, कोणत्या सल्लागार मंडळाच्या देखरेखेखाली या स्मार्ट सिटीच काम चालते याची माहिती परांजपे यांनी अधी घ्यावी. जनतेने दोन वेळा दिल्लीवरून गल्लीत पाठविल्यामुळे दिल्लीतील योजनांचा विसर आणि कार्यपद्धती हे परांजपे बहुधा विसरले असावेत, असा टोला शिवसेनेने आनंद परांजपे यांना लगावला.

मंत्रोच्चारांसाठी नक्की निमंत्रण देऊ
सतत दोन दिवस नारद नारदचा गजर करणाऱ्या परांजपे आणि त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने लक्षात ठेवावे नारद, हा बुद्धिमान होता. त्यामुळे भविष्यात गारद होण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी हा गजर वेळेवरच थांबविला तर ते हिताचे होईल, कल्याण लोकसभा क्षेत्रात पुढच्या महिन्यात पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनचे उद्घाटन होणारच आहे. इतर प्रकल्प सुध्दा मार्गी लागणार आहेत तेव्हा निश्चितपणे या उद्घाटनाच्या कार्यक्रमांना आनंद पराजपे यांना मंत्रोच्चार करण्यासाठी  निमंत्रण देण्यात येईल. असे शिवसेनेने म्हटले.

त्यांच्याकडून फक्त स्वार्थासाठी दोस्तीचा गजर
प्रत्येक कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री हे स्वत: आणि शिवसेना नेते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यातील दोस्तीचे दाखले वारंवार देऊ लागले आहे. मात्र या मैत्रीला त्यांनी स्वार्थाची झालर लावली आहे. केवळ आपले काम सध्या करण्यासाठी आणि निधी मिळविण्यासाठी आणि निवडणुकीत आघाडी करण्यासाठी हे दोस्तीचे दाखले देण्यात येत आहेत. हे जनतेला तर माहित आहेच पण खुद्द पालकमंत्री शिंदे यांनाही हे ज्ञात आहे. त्यामुळे मैत्री करावी तर ती नि:स्वार्थी करावी. आनंद पराजपे यांच्याच भाषेत सांगायचं म्हंटल तर परमार्थात स्वार्थ नसावा, असा टोलाही शिवसेने हाणला.