मुरबाड। कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूरी मिळाली असून, प्रकल्पासाठी 10 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प रद्द असल्याच्या अफवा निराधार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्प सुरू होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या 70 वर्षांपासून रेल्वेच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो मुरबाडकरांच्या मागणीनुसार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी शेतकर्यांनी सहकार्य केल्यामुळे अवघ्या महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण होणारा हा देशातील पहिला रेल्वे प्रकल्प ठरला होता.
त्यानंतर या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शेतकर्यांना नोटीसा दिल्या आहेत. तर शेतकर्यांनीही कोणत्याही परिस्थितीत जमिनीअभावी प्रकल्पाचे काम थांबणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रेल्वेमार्ग जाणार असलेल्या भागात शेती केली जात असून जमिनीचे व्यवहार रजिस्टर्ड झालेले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांच्या जमिनीला रेडीरेकनरनुसार कमी भाव मिळत आहे. या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री यांच्याबरोबरच रेल्वे अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात दोन वेळा बैठक झाल्या होत्या . त्यानंतर या शेतकर्यांना जमिनींना योग्य मोबदला देण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री यांनी दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. मुरबाडच्या रेल्वे प्रकल्पासाठी गेल्या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही तरतूद झाली होती. त्यात यंदा 10 कोटी 36 लाखांची तरतूद झाली आहे. या हेडमुळे प्रकल्पाच्या कामासाठी लगेचच अर्थसंकल्पातून वाढीव रक्कम ही मंजूर करता येते. लागोपाठ दुसर्या वर्षी हेड तयार केल्यामुळे हा प्रकल्प रेल्वेच्या यादीमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाल्याच्या चर्चा निराधार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुरबाडकर जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आभार मानले आहेत.