घरठाणेराजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाचे नुतनीकरणाचे काम दोन महिन्यात पूर्ण करावे- आयुक्त...

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाचे नुतनीकरणाचे काम दोन महिन्यात पूर्ण करावे- आयुक्त अभिजीत बांगर

Subscribe

ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृह नुतनीकरणाचे काम जलदगतीने सुरू करण्यासाठी लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी व संपूर्ण वसतीगृहाचे नुतनीकरण हे येत्या दोन महिन्यांत पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. या बैठकीत वसतीगृहाच्या नुतनीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच माजिवडा येथील पोस्ट कोविड सेंटर वा शहर विकास आराखड्यातंर्गत राखीव असलेल्या जागेत विकसकाकडून प्राप्त होणाऱ्या १२ मजली इमारतीत महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या कामांबाबतही चर्चा करण्यात आली.

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, त्यावेळी वसतीगृहाची दुरावस्था त्यांनी पाहून तेथील मुलांशी संवाद साधला असता मुलांनी वसतीगृह तसेच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या. सदरचे वसतीगृह हे निवासी डॉक्टरांसाठी असून रुग्णालयामध्ये चांगल्या रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यामध्ये या निवासी डॉक्टरांची फार मोठी भूमिका असते, त्यामुळे त्यांना चांगले वसतीगृह उपलब्ध करुन दिल्यास रुग्णसेवा सुधारण्यामध्ये मोठी मदत मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देवून अत्यंत चांगल्या अत्युच्च दर्जाच्या सुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतीगृहाच्या इमारतीचे नुतनीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटसह अंतर्गत भागाची दुरूस्ती, स्नानगृह, शौचालयांची पुरेशी संख्या, खोलीची अंतर्गत रचना कशी असेल, तसेच विद्यार्थ्यांसाठी कॉमनरुम तसेच कॅफेटेरियाची रचना आदी बाबींचा आढावा आयुक्त बांगर यांनी या बैठकीत घेतला.यासाठी आवश्यक असलेल्या वसतीगृहाच्या नूतनीकरण कामाची आखणी, निविदा प्रक्रिया लवकरात लवकर होईल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहांमध्ये सुधारणा करुन  डॉक्टरांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच नुतनीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आग्रही भूमिका असून त्या पध्दतीने सर्व कामे ही विनाविलंब करण्यासाठी सर्वानी दक्ष रहावे असेही बांगर यांनी नमूद केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपनगरअभियंता रामदास शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

वातानुकूलित वसतीगृहासह खोल्यांची संख्या वाढवावी
सद्यस्थितीत वसतीगृहात राहत असलेले विद्यार्थी व निवासी डॉक्टरांची संख्या ही २२१ इतकी आहे. २०४ विद्यार्थी राहू शकतील असा आराखडा तयार करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जागा अपुरी पडत असेल तर मुलींचे वसतीगृह वेगळे करण्यासाठी प्रयत्न करु. पण एकाच ठिकाणी जास्त गर्दी करणे योग्य नाही. नुतनीकरण करताना वसतीगृहाची संपूर्ण इमारत ही वातानुकूलित असावी, तसेच वसतीगृहातील खोल्यांची रचना करताना एका खोलीत दोन विद्यार्थी, त्यांच्यासाठी आवश्यक असलेले बेडस्, कपाटांची रचना, स्टडी टेबल तसेच खोलीत पुरेसा उजेड अशा पध्दतीने खोलीची रचना करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी या बैठकीत दिल्या.

- Advertisement -

निवासी डॉक्टरांसाठी सोईसुविधा उपलब्ध कराव्यात
वसतीगृहाच्यासमोर आणि मागील बाजूस असलेल्या जागेचा वापर निवासी डॉक्टरांना क्रीडा सुविधा देण्यासाठी करावा. त्यांच्याशी चर्चा करून खेळासाठी लागणारी व्यवस्था उभी करावी, वसतीगृहालगतच्या मोकळ्या जागेत अभ्यास, मनोरंजन तसेच जिम आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्या सेवा कॅन्टीनशी जोडून घ्याव्यात असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.                                                       

वसतीगृहातील विद्यार्थ्यांची सोय करावी
वसतीगृहाच्या इमारतीच्या नुतनीकरणादरम्यान विद्यार्थ्यांना खेवरा सर्कल येथील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करावे, तेथेही पाणी, लाईट आदी सु‍विधा उपलब्ध करुन देणेबाबत कार्यवाही करावी.

महाविद्यालयाचा आराखडा तयार करावा
शहर विकास आराखड्यातंर्गत राखीव असलेल्या जागेत विकसकाकडून महापालिकेस प्राप्त झालेल्या १२ मजली इमारतीत महाविद्यालय सुरू केले जाणार असून या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामाचा आढावाही आयुक्त बांगर यांनी या बैठकीत घेतला. या इमारतीत आवश्यकतेनुसार वर्गखोल्या, प्रयोगशाळेची निर्मिती, कँटीन सुविधा यासाठी वास्तुविशारदांकडून आराखडा तयार करुन घ्यावा. त्यानुसार स्थापत्य कामांमध्ये बदल करणे, आवश्यकतेनुसार फर्निचरची कालमर्यादा निश्चित करुन पूर्ण करुन घेण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -