घरठाणेमालमत्ता कराची विक्रमी वसुली, ७११ कोटी मालमत्ता कर तिजोरीत जमा

मालमत्ता कराची विक्रमी वसुली, ७११ कोटी मालमत्ता कर तिजोरीत जमा

Subscribe

इतिहासात पहिल्यांदाच ७०० कोटीचा आकडा महापालिकेने केला पार 

ठाणे शहरात विकासकामे मुलभूत सेवासुविधांबरोबरच ठाण्याच्या सौंदर्यीकरणामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानातंर्गत हाती घेतलेली विकास कामे पूर्णत्वास येत असून ठाण्याचे नवीन चित्र नागरिकांना अनुभवायला मिळत असून हे  निश्चितच नागरिकांनी कर रुपाने दिलेल्या प्रतिसादामुळे शक्य झाले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ७११ कोटी इतकी विक्रमी मालमत्ता कराची वसुली ३० मार्च रोजी म्हणजेच मार्च अखेर एक दिवस आधीच पूर्ण झाली आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत मालमत्ता कराच्या संकलनामध्ये ११५ कोटीची विक्रमी वाढीव वसुली झाली आहे. ठाणे शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच ७०० कोटीचा आकडा महापालिकेने पार केला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी  ७०५.२५ कोटी इतके सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. सध्या ७११ कोटी इतका मालमत्ता कर संकलित झाला असून तो एकूण अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या सुमारे ९५ % इतका आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करापोटी ५९१ कोटी मालमत्ता कराची वसुली झाली होती.

यंदा मालमत्ता कर संकलन व वसुली प्रभावीपणे होणेकरिता वरिष्ठ स्तरावर विभागप्रमुखांच्या नियमितपणे बैठका घेवून मार्गदर्शन करण्यात आले. विहित मुदतीत कर संकलनाकरिता मालमत्ता कर संलग्न सर्व संकलन केंद्रे शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली होती. या व्यतिरिक्त सोशल मिडीया, चित्रपटगृहे, नाट्यगृहे व ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच मुख्यालय स्तरावरील पथकाद्वारे मोकळ्या जागेवरील कराच्या थकबाकीदारांना देखील आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरणा केला आहे. विकसकाच्या प्रलंबित थकबाकीबाबत जोपर्यत प्रलंबित कर वसूल होत नाही तोपर्यत विकास परवानग्या देण्यात येवू नयेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या, त्यामुळे मालमत्ता कर वसुलीला चालना मिळाली आहे.

- Advertisement -

मार्च महिन्यात ८३.४५ कोटींची वसुली
मार्च २०२३ या एका महिन्यात ८३.४५ कोटी इतकी मालमत्ता वसुली झाली, पैकी १५ मार्च ते ३० मार्चपर्यत ५९.६० कोटी वसुली झाली. तर एकूण वसुलीत ऑनलाईन पध्दतीने १६६.१७ कोटी, धनादेशाद्वारे ३४९.५६ कोटी, धनाकर्षद्वारे १००.१६ कोटी, डेबीट कम एटीएम व क्रेडीट कार्ड पध्दतीने २.०३ कोटी,  रोखीने ९३.२२ कोटी इतकी वसुली झाली. नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, ही योजना जास्तीत जास्त सोपी व सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे असेही आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

यंदाही अशी दिली गेली आहे सूट…
जे करदाते थकबाकी व पहिल्या सहामाहिच्या करासोबत दुसऱ्या सहामाही अशी एकरकमी करभरणा महापालिकेकडे १ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीत करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या मालमत्ता करातील सामान्य करामध्ये १० टक्के सूट तर १६ जून ते ३० जून २०२३ या कालावधीत कर भरणाऱ्यांना ४ टक्के सूट, १ जुलै ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत कर भरणाऱ्यांना ०३ टक्के तर  १ऑगस्ट ते ३० ऑगस्ट 2023 या कालावधीत ०२ टक्के सूट देण्यात येणार आहे. तरी करदात्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपला मालमत्ता कर भरणेसाठी आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

यंदा माहिती मोबाईल आणि ई-मेल मिळणार.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके तयार होत असून त्याबाबतची सूचना महापालिकेच्या अभिलेखी असलेल्या मोबाईल क्रमांक, ई-मेल द्वारे देण्यात येणार आहे. या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके छपाई करुन प्रभाग कार्यालयामार्फत वितरित करणेची कार्यवाही सुरु करण्यात येत असून याकरिता काही कालावधी अभिप्रेत आहे. या कालावधी दरम्यान करदाते त्यांच्या देयकाची संगणकीय प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे अथवा प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावरुन उपलब्ध करुन घेवू शकतील. तसेच  या लिंकद्वारे इंटरनेट बँकिंग, डेबिटकार्ड, क्रेडिट कार्ड तसेच GooglePay, PhonePe, PayTm व BHIM App याद्वारे करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करु शकतील. मालमत्ता कर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
थकबाकीची वसुली करणार
ज्या करदात्यांनी विहित मुदतीत मालमत्ता कर जमा केलेला नाही अशा करदात्यांना वॉरंट बजावून मालमत्तांची जप्ती / अटकावणी करण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाई अंतर्गत संबंधित मालमत्तेस महापालिकेकडून देण्यात येणान्या सेवा-सुविधा (नळ संयोजन व इतर) खंडीत करण्याचे सुरु आहे. यानंतर संबंधित मालमत्तेचे मुल्यांकन करुन जाहीर प्रसिध्दीकरणाद्वारे मालमत्तेचा लिलाव प्रक्रिया राबवून मालमत्ता कर वसूल करण्यात येणार आहे. लिलाव प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार सदरची मालमत्ता रु.1/- या नाममात्र किंमतीने महापालिकेच्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत. अशा प्रकारे मालमत्ता कराची थकबाकी वसूल करणेकरिता प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.

झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट पध्दतीने कर वसुलीसाठी उपाययोजना
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक / करदात्यांना मालमत्ता करसंलग्न सोयी- सुविधा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यामध्ये करदाते त्यांच्या घरातून अथवा कार्यालयातून अथवा इतर ठिकाणाहून मालमत्ता करसंलग्न सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपल्या मालमत्तेवर किती कर प्रलंबित आहे, जर दंड लागू करण्यात आला असेल तर त्याची रक्कम किती आहे, मालमत्ता कर भरणा कोणकोणत्या पध्दतीने करता येईल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे नागरिकांना महानगरपालिकेच्या वेबसाईटद्वारे घरच्या घरी मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येण्याची व कोणास भेटण्याची गरज  पडू नये अशा पध्दतीने प्रक्रिया सुलभ होईल याकडे विशेष लक्ष दिले आहे.

” २०२३-२४ चा अर्थसंकल्प मंजूर झाला असून त्यामध्ये मालमत्ता करासाठी ८०० कोटीचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे. चालू वर्षात केलेल्या वसुलीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी ८०० कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या प्रलंबित दायित्वाचे मोठे आव्हान आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी एका बाजूने खर्चाची आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे असून दुसरीकडे उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांना प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या प्रयत्नांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळणे आवश्यक आहे. यावर्षी अर्थसंकल्पात प्रलंबित जीआयएस सर्व्हे च्या आधारे एकूण मालमत्ता कराचा बेस वाढविण्यामध्ये मोठी मदत होणे अपेक्षित आहे. मालमत्ता करसंकलनात नागरिकांनी महानगरपालिकेचया आवाहनाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल ठाणेकर नागरिकांचे धन्यवाद केले. ”

–  अभिजीत बांगर, आयुक्त, ठामपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -