घरठाणेमराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन ही धूळफेक

मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन ही धूळफेक

Subscribe

जरांगे पाटील यांचा कोणीतरी वापर करीत आहेत, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड असीम सरोदे यांची टीका

डोंबिवली । जरांगे पाटील यांची कुणीतरी दिशाभूल केली किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून त्यांचा वापर करीत आहेत. सगेसोयरे अशा प्रकारची व्याख्या कायद्यात घ्यायची असेल तर ती एखादे नोटिफिकेशन किंवा सर्क्युलेशन काढून बदल होऊ शकत नाही. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल, त्यासाठी केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनी येऊन भेटले पाहिजे, असा आग्रह मनोज जरांगे पाटील यांनी ठेवला पाहिजे. अशा प्रकारचे कोणतेही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही, त्यामुळे हे विशेष अधिवेशन मराठा समाजाच्या नावाने बोलावले असले तरी ही एक धूळफेक आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदे यांनी डोंबिवलीत केला.

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजागर प्रतिष्ठानच्यावतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकली जाते, याबाबत असिम सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाकडून विद्यार्थ्यांचा तसेच लहान मुलांचा वापर इलेक्शनच्या कामासाठी करू नये किंवा प्रचारासाठी करू नये असे नोटिफिकेशन काढले आहे. त्याच धर्तीवर शिक्षकांचा सुद्धा असा गैरवापर होऊ नये, यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली पाहिजे. निवडणूक आयोग स्वायत्त यंत्रणा आहे. त्यांनी स्वतःची वेगळी टीम तयार केली पाहिजे. इलेक्शनच्या कामासाठी पदवीधर असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देऊन तात्पुरत्या कामासाठी घेतले पाहिजे. निवडणुकीच्या कामासाठी पगारदार म्हणून कुणाला तरी तात्पुरता स्वरूपात नेमणे हे अधिकार निवडणूक आयोगाला असताना शिक्षकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे अ‍ॅड सरोदे यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील सरकार कायदेशीर की बेकायदेशीर? याबाबत बोलताना अ‍ॅड असीम सरोदे म्हणाले कि, कायदेशीर दृष्टिकोनातून बघितले तर हे सरकार अस्तित्वात येणे चुकीचे आहे. मात्र सध्या निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालणारी संस्था झाली आहे. तर निवडणूक अधिकारी हे पाळीव अधिकारी झाल्याचे टीका केली. त्यामुळे त्यांना सांगितल्याप्रमाणेच ते निर्णय घेतात. राहुल नार्वेकर कायदा धाब्यावर बसवून त्यांना जसे सांगण्यात आले तसा निर्णय देतात हे माझे स्पष्ट मत आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटच्या अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस एकमेव पक्ष फुटला नव्हता. मात्र अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतले गेले. देश काँग्रेसमुक्त करायचा असे स्वप्न भाजपा दाखवत होते. मात्र आता भाजपा काँग्रेसयुक्त झाल्याची टीका असीम सरोदे यांनी केली. भाजपाने आत्तापर्यंत काँग्रेस सह इतर पक्षांच्या अनेक लोकांना भाजपात घेतले आहे. उद्या भाजप फोडण्यासाठी हेच कारणीभूत ठरणार असून ही खूप मोठी डोकेदुखी भाजपने स्वतःवर ओढवून घेतली असल्याचे अ‍ॅड सरोदे यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या प्रमाणात राजकीय वापर होतोय तो चुकीचा आहे. छत्रपती हे रयतेचे राजे होते, पण ते एकही पैसा स्वतःसाठी, प्रसिद्धीसाठी वापरत नव्हते. रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावायचा नाही, अशी आपल्या सैन्याला त्यांची सक्त ताकीद होती. सध्या जनतेच्या पैशातून सरकारी जाहिरातबाजी सुरू आहे. जाहिरात बाजीच्या भरवशावर कोण पंतप्रधान होणार? हे ठरवायचं असेल तर महाराष्ट्रात जाहिरात जातीच्या जोरावर एकनाथ शिंदे हेच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज असते तर सर्व रोष त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारच्या जाहिरातबाजीवर व्यक्त केला असता. सर्वसामान्यांच्या गरजांसाठी खर्च करणे आवश्यक असताना तुम्ही जाहिरात बाजीसाठी कसे काय खर्च करू शकता? असा खडा सवाल अ‍ॅड .असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे. राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांचा धोरणांचा विचार नाही म्हणून फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर केवळ भावनिक राजकारण करायचंय, हे महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला दिसायला लागले असल्याचे सरोदे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -