घरमहाराष्ट्रबुलढाणा विधानसभेत काँग्रेसचा बोलबाला

बुलढाणा विधानसभेत काँग्रेसचा बोलबाला

Subscribe

सध्या राज्यभर भाजप-शिवसेनेची चर्चा सुरू असली तरी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विधानसभांपैकी बुलढाणा विधानसभा यासाठी अपवाद आहे. या ठिकाणी काँग्रेसचाच बोलबाला आहे. देशात किंवा राज्यात कितीही मोठी लाट आली तरी बुलढाण्यात काँग्रेसला कुणी हलवू शकत नाही. कारण येथील मतदार सुशिक्षित आहेत. त्यामुळे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत सेना,भाजपची युती झाली किंवा न झाली तरी त्यांना बुलढाण्यातून काँग्रेसला हटवणे तितके सहज सोपे नाही.

गेल्या पाच वर्षांपासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच जम बसवला आहे. तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या विजयराज शिंदे यांचा 2014 साली त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला. गेल्या निवडणुकीत सेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढली त्याचाही काँग्रेसला फायदा झाला.

- Advertisement -

हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन आपली स्वतःची एक व्होट बँक तयार केली आहे. त्यामुळेच त्यांना राहुल गांधी यांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त केले. दुसरीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होईल कि नाही, अजून स्पष्ट झाले नाही. जरी युती झाली तरी युतीधर्म इथे दोन्ही पक्षांकडून प्रामाणिकपणे पाळला जाईल, हेही खात्रीने सांगता येत नाही. त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात सध्यातरी काँग्रेसचे पारडे जड आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ हा आपल्याकडे हवा यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

सध्या हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. शिवसेनेकडून मात्र विजयराज शिंदे पुन्हा एकदा इच्छुक असले तरी 2014 निवडणुकीत मनसेकडून दुसर्‍या क्रमांकाची मते घेणारे संजय गायकवाड हे आता शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे शिवसेनेत सध्या उभी फूट पडली आहे. सध्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले संजय गायकवाड यांनी तिकिटासाठी जोर लावला आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत हे सुद्धा तिकिटासाठी उत्सुक आहेत.

- Advertisement -

बुलढाणा लोकसभा मतदार संघापैकी चिखलीमध्येही काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे यांनी या ठिकाणी मतदार संघ उत्तम बांधला आहे. त्यांनीही स्वत:ची व्होट बँक तयार केली असून तळागळापर्यंत संपर्क ठेवला आहे. त्यामुळे या ठिकाणीही शिवसेना, भाजपला शह देणे तितके सोपे नाही.

बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा आणि आमदार
बुलढाणा – हर्षवर्धन सपकाळ – काँग्रेस – ४६,९८५
चिखली – राहूल बोंद्रे – काँग्रेस – ६१, ५८१
सिंदखेडराजा – डॉ. शशिकांत खेडेकर – शिवसेना – ६४, २०३
मेहकर – संजय रायमूलकर – शिवसेना – ८०, ३५६
खामगांव – आकाश फुंडकर – भाजप – ७१, ८९१
जळगाव जामोद – डॉ. संजय कुटे – भाजप – ६३, ८८८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -