घरमहाराष्ट्रशहरात निरुत्साह, गावात उत्साह

शहरात निरुत्साह, गावात उत्साह

Subscribe

२०१९-६०.४६% मतदान ,२०१४-६३.०८% मतदानपाऊस आणि हिंसाचाराच्या घटना

प्रचार फेर्‍या, नेत्यांच्या सभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यांच्यासह सुरू असलेल्या चार आठवड्याच्या रणधुमाळीनंतर सोमवारी राज्यात २८८ जागांसाठी मतदान झाले. यावेळी ६०.४६ टक्के मतदान झाले. २०१४ साली ६३.०८ टक्के मतदान झाले होते. गतवेळेच्या तुलनेत ३ टक्के मतदान कमी झाले. कमी झालेले मतदान कोणाला मारणार आणि कोणाला तारणार याचा फैसला गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता राज्यात एरव्ही मतदान शांततेत पार पडले.

मात्र कर्तव्य बजावत असताना तिघांचे गडचिरोली आणि कोल्हापूर येथे निधन झाले. शहरी भागातील मतदारांमधील निरुत्साह, सलग आलेल्या सुट्ट्या आणि पावसामुळे मतदानाची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत घसरली. मात्र ग्रामीण भागांत मतदार राजात उत्साहात दिसला. आजच्या मतदानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले आहे.

- Advertisement -

राज्यातील २८८ जागांसाठी सोमवारी मतदान झाले. मतदान शांततेत पार पडावे म्हणून राज्यभरात सुमारे ३० लाख पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक मतदार केंद्रांवर ईव्हीएम मशीन बिघडण्याच्या घटना घडल्या, मात्र लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदार यादीत नाव नसल्याचे प्रकार विरळ होते. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोमवारी राज्यात औरंगाबाद, बीड, बारामती, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, गडचिरोली, कोकणात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. पाऊस आल्यामुळे काही मतदार केंद्रांवर मतदार रांगा सोडून घरी निघून गेल्याचे दिसून आले. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये सकाळपासूनच मतदानाचा निरुत्साह दिसून आला. मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी होती. दुपारनंतर मात्र अनेक मतदार केंद्रांवर गर्दी झाल्याचे दिसून आले.

दिग्गज भवितव्य मतपेटीत बंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, आशिष देशमुख, नसीम खान, शेकापचे विवेक पाटील, बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर, नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक, माकपचे नरसय्या आडम आदी दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले.

- Advertisement -

वंचितच्या उमेदवारावर हल्ला
नांदेड जिल्ह्यातील देगलुर विधानसभा मतदारसंघात,अंतापूर चैनपूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या गाडीच्या काचा फोडून नासधूस करण्यात आली आणि प्रा.रामचंद्र भरांडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. भरांडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासह जालना आणि सोलापूरमधील करमाळा या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर हल्ले झाले आहेत.

एमआयएम, राष्ट्रवादीत झडप
औरंगाबादेतील मंजूरपुरा लोटाकारंजा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या कारणावरून एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. दोन्ही गटांत जुंपल्याने या मतदान केंद्रावर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला असून सध्या या केंद्रावरची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येते. मंजूरपुरा लोटाकारंजा येथे बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मुलाने एमआयएमच्या पोलिंग बूथचा टेबल फेकला. यावेळी दोन्ही गटांत शिवीगाळ होऊन त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. त्यामुळे या भागात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तातडीने पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले.

भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील बांधखंडक गावामध्ये वाहनातून मतदार वाहतुकीच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार व भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली. त्यात एकावर चाकूहल्ला झाला, तर एका वाहनाची तोडफोड झाली आहे. यामध्ये दोघे जखमी झाले असून, दोन्ही गटांतील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर चाकूहल्ला केला आहे.

सिटी बँकेच्या खातेदारांचा बहिष्कार
मुंबईतील सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादून दीड वर्ष उलटले तरी बँकेला डबघाईला आणणार्‍यांवर कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने तसेच बँकेचे विलीनीकरण करण्यात चालढकल केली जात असल्याने त्याचा निषेध करत बँकेच्या खातेधारकांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला. काही खातेधारकांनी नोटाचा पर्यायही वापरला. या बँकेच्या मुंबईत १० शाखा असून सुमारे ९१ हजार खातेधारक आहेत.

निवडणूक कर्तव्यावर शिक्षकाचा मृत्यू
गडचिरोलीतील एटापली तालुक्यातील पुरसुलगोंदी येथील मतदान केंद्रावर पायी जात असताना भोवळ येऊन पडल्याने निवडणूक कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला. या शिक्षकाला मिरगीचा आजार असल्याचे सांगण्यात येते. बापू गावडे असे या शिक्षकाचे नाव आहे. तसेच सर्जेराव भोसले या शिक्षकाचे करवीर नगर येथे निधन झाले आहे.

पाटील यांची मनसे उमेदवाराला ऑफर
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सोमवारी मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी उमेदवाराला भाजप प्रवेशाची ऑफर देऊन टाकली. अर्थात, त्यांची ही ऑफर मनसेचे किशोर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत धुडकावून लावली. मात्र, या ऑफरची पुण्यासह राज्यात सध्या जोरदार चर्चा आहे.

मतदानाचे लाईव्ह कव्हरेज
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

ईव्हीएमविरोधात काँग्रेसच्या २२१ तक्रारी
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेते, कलाकार मंडळी मतदानाचा हक्क बजावित आहे. काही भागांत ईव्हीएमबाबतच्या तक्रारी येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत.

मतदानावर बहिष्कार
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सोमवारी होत असलेल्या मतदानाकडे यवतमाळमधील धारकान्हा गावा आणि पालघरमधील वाढवण आणि धाकटे डहाणूमधील मतदारांनी मतदानाकडे चक्क पाठ फिरवली आहे. वाढवण बंदराच्याविरोधात वाढवण आणि धाकटे डहाणूमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. धारकान्हा गावातील बूथ क्र. ३६ वर कुणीही मत देण्यासाठी आलेले नाही. प्रशासनाकडून नागरी सुविधा उपलब्ध न झाल्याने गावकर्‍यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.

अस्थि विसजर्न करून मतदान
बदलापूर वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचे 19 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या अस्थीचे विसर्जन करून लागलीच म्हात्रे कुटुंबियांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. घरात दु:खाचे वातावरण असतानाही म्हात्रे कुटुंबियांनी मतदान केले. बदलापूर वडवली भागातील पांगळू म्हात्रे यांचे 19 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यावर त्यांच्या अस्थि विसर्जनाचे कार्य करून लागलीच म्हात्रे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपला मतदानाचा हक्क बजावला.

मुंबईत ४९.९ टक्के मतदान

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारी पार पडली असून सायंकाळपर्यंत या सर्व मतदारसंघांमध्ये सरासरी ४९.९ टक्के मतदान कमी झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मुंबईमध्ये सरासरी ६२ टक्के एवढे मतदान झाले होते, परंतु त्या तुलनेत मुंबईकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. शनिवार ते सोमवार अशा सलग तीन दिवस असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी पिकनिकचा बेत करत बाहेरचा रस्ता धरल्याने मतदानाची ही टक्केवारी कमी झाल्याचे बोलले जात आहे. तसेच लोकसभेमध्ये मोदींच्या नावावर मतदानाला उतरणारा मतदार विधानसभेत उतरला नसल्याने अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून येत होता. अनेक मतदारसंघांमध्ये घटलेल्या मतांच्या टक्केवारीमुळे अटीतटींच्या प्रमुख लढतीतील उमेदवारांमध्ये धाकधुक वाढवलेली आहे. त्यामुळे आमदारकीच्या स्वप्नाचे भविष्य मतदारांनी मतपेटीत बंद केलेले असून कुणाच्या नशिबात आमदारकीचा राजयोग पुन्हा येतो हे येत्या २४ तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि गुप्त बैठका घेत उमेदवारांनी मतांची फिरवाफिरवी केली. त्यामुळे प्रचार आणि गुप्त बैठकांमधील मतांची फिरवाफिरवी केल्यानंतर प्रत्यक्षात सोमवारी मतदानाचा दिवस उजाडला. मात्र, सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच लोकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली असली तरी पुढे ही गर्दी कायमच ओसरती राहिली. त्यामुळे प्रत्येक मतदार केंद्रांवर मतदारांच्या कमी गर्दीमुळे एक प्रकारचा निरुत्साहच दिसून येत होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४९.९ टक्के एवढी झाली. शहरामध्ये ४८.६३ टक्के तर उपनगरांमध्ये ५१.१७ टक्के एवढे मतदान झाले होते.

सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी अनेक मशीनमध्ये तांत्रिक दोष आढळून आला होता. त्यामुळे काही प्रमाणात गोंधळ झाला होता, पण त्यानंतर हा दोष दूर करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. ही मतदान यंत्रे उघड्यावर ठेवल्यामुळे गेले दोन दिवस पाऊस पडल्याने वातावरणातील बदलामुळे एक प्रकारे मशीनमध्ये बाष्पसदृश्य परिस्थिती निर्माण होत त्रुटी निर्माण झाल्या होता, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उमेदवारांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू झाल्याने अनेक उमेदवारांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानुसार अनेक उमेदवारांनी आपली रणनीती देखील आखण्यास सुरुवात केली होती. मात्र, सोमवारी सकाळपासून वरुणराजाने मुंबईतून काढता पाय घेतल्याने उमेदवारांसह मतदारांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला. त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मतदान सुस्थितीत पार पडले.

यासर्व मतदारसंघांपैकी भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक अर्थात ५६.९३ टक्के मतदान झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या तुलनेत यंदा दीड टक्का मतदान वाढले आहे, तर सर्वाधिक कमी मतदान कुलाबा येथे झाले आहे. कुलाब्याला ४०.२० टक्के मतदान झाले आहे. जे मागील विधानसभा निवडणुकीत ४६.२० टक्के झाले होते. त्या खालोखाल कमी मतदान झालेल्या मतदारसंघात वर्सोव्याचा समावेश आहे. वर्सोवा मतदारसंघात ४२.६६ टक्के मतदान झाले आहे, परंतु मागील निवडणुकीत तेथे ४१.५९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे कमी मतदान झाले असले तरी एक टक्क्याने मतदान वाढले आहे.

तक्रारींचा पाऊसही ओसरला
निवडणूक म्हटले तर मतदार याद्यांमधील घोळ हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या मुद्यांवरून गेल्या अनेक निवडणुका देखील गाजविल्याच्या अनेक तक्रारी आपल्या सर्वांसमोर आहेत. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमधील त्रुटींच्या तक्रारी कमी झाल्याचे चित्र मुंबईसह राज्यात सर्वत्र दिसून आले. काही तुरळक ठिकाणी यादीतील नावांच्या घोळ्यांच्या तक्रारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यंदा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे या तक्रारी कमी झाल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील सर्वाधिक मतदान झालेली केंद्र
भांडुप पश्चिम : ५६.९३ टक्के
मागाठाणे : ५५.८३ टक्के
विक्रोळी : ५४.५४ टक्के
मालाड पश्चिम : ५५.३७ टक्के
अणुशक्तीनगर: ५५.३० टक्के

सर्वाधिक कमी झालेले मतदान केंद्र
कुलाबा : ४०.२० टक्के
वर्सोवा : ४२.६६ टक्के
अंधेरी पश्चिम :४३.२२ टक्के
वांद्रे पश्चिम : ४३.७६ टक्के
मुंबादेवी : ४४.७१ टक्के

ठाणे, पालघर, रायगडमध्ये मतदानाची टक्केवारी घटली

ठाण्यात एकूण ५० टक्के मतदानाची नोंद झाली, तर पालघर जिल्ह्यात ५९ टक्के मतदानाची नोंद झाली. ठाणे, पालघरसह भिवंडी, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, मुरबाड, शहापूर, पनवेल, नवी मुंबईतही मागील वर्षाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरल्यामुळे दिग्गज उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. दोन्ही जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी सकाळी रिमझिम सरी बरसल्यामुळे मतदार घराबाहेर पडला नव्हता. मात्र, दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र होते. ठाण्यातील वयोवृद्धांनी मतदानासाठी उत्साह दाखवला. मात्र, तरुणांची उदासीनता पहायला मिळाली.

मतदान केंद्रावर ड्युटी बजावणार्‍या एका कर्मचार्‍याच्या चुलत्यांचे निधन झाल्यावरही त्यांनी या कर्मचार्‍याने मतदान केंद्रावरील आपल्या सेवेचे कर्तव्य बजावले. तर रायगडमध्ये 65.57 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ साली ६७.६६ टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत २ टक्के मतदान कमी झाले. सर्वाधिक मतदान 73 टक्के उरण, तर सर्वात कमी 56 टक्के मतदान महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पनवेल मतदारसंघात झाले. ईव्हीएम मशिन बंद पडणे यासारखे काही प्रकार वगळता मतदान सर्वत्र शांततेत पार पडले. किरकोळ पाऊस वगळता मुसळधार पावसाचा अंदाज चुकल्याने मतदार उत्स्फूर्तपणे मतदानास बाहेर पडत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पहावयास मिळाले.

सात मतदारसंघांतून व्हीडिओ व्हायरल 

नाशिक जिल्ह्यात येवला मतदारसंघात विंचूर येथे एक, नाशिक पूर्व, बागलाण, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, मालेगाव मध्य मतदारसंघात प्रत्येकी एकाने व देवळाली मतदारसंघात दोनजणांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले. आठ मतदारांनी इव्हीएम मशीनवर मतदान करतानाचा मोबाईलमध्ये व्हिडीओ व फोटो आठजणांनी काढला. मतदान केंद्राबाहेर येत त्यांनी मतदानाचा व्हीडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

राज्यात पुन्हा युतीच

सोमवारी मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या विविध वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजप-शिवसेनेचीच सत्ता येणार आहे. तर या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ होणार आहे. सर्व एक्झिट पोलच्या आकडेवारींच्या सरासरीनुसार, महायुतीला २१३ जागा, महाआघाडीला ६१ जागा तर इतर पक्षांना १४ जागा मिळणार आहेत.

मुंबईतील ३६ जागांपैकी ३० जागांवर शिवसेना -भाजपाला यश मिळताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईत ३ जागा तर अन्य जागांवर ३ जणांना संधी मिळताना पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात भाजप-शिवसेनेला २९ जागा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला ६ जागांवर समाधान मानावे लागत आहे.मात्र एक्झिट पोलमध्ये तथ्य वाटत नाही, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा सर्व आघाडीवर सरकार अपयशी राहिले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला जो प्रतिसाद राज्यात मिळाला आहे. निश्चितच जनमत २४ तारखेला आघाडी मिळेल. त्यामुळे ही आकडेवारी संपूर्ण चुकीची आहे अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, शिवस्मारक, इंदु मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा अनेक मुद्द्यावर राज्य सरकारला बोलण्यासारखं काहीच नाही. जनसंघर्ष, हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राज्यभर यात्रा काढली, लोकांच्या मनात नक्कीच बदलाचे वातावरण आहे. महागाईची झळ लोकांना बसली आहे. या सरकारला घालवायचे परिवर्तन करायचे यासाठीच मतदान झाले आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं. एक्झिट पोलचे आकडेवारी फोल ठरतील हे २४ तारखेला दिसेल असं त्यांनी सांगितले.

एबीपी – सी व्होटर
महायुती – १९२ ते २१६
(भाजप- १२३ ते १३०, सेना ७९ ते ८६)
महाआघाडी – ५५ ते ८१
(काँग्रेस २५ ते ३०, राष्ट्रवादी ३० ते ३१)
इतर – ४ ते २१

इंडिया टुडे-एक्सिस
महायुती – १६६ ते १९४
(भाजप १०९ ते १२४ + शिवसेना ५७ ते ७०)
महाआघाडी ७२ ते ९०
(काँग्रेस ३२ ते ४० + राष्ट्रवादी ४० ते ५०)

टाईम्स नाऊ
महायुती २२५ ते २३०
(भाजप -१२५ ते १३५, सेना -९५ ते १०५)
महाआघाडी ४५ ते ५१
(काँग्रेस -२५ ते ३०, राष्ट्रवादी – १८ ते २२)
इतर ८ ते १२

रिपब्लिक टीव्ही – जन की बात
महायुती २१६ ते २३०
(भाजप १३५ ते १४२ + शिवसेना ८१ ते ८८)
महाआघाडी ५० ते ५९
(काँग्रेस २० ते २४ + राष्ट्रवादी ३० ते ३५)
इतर – ८ ते १२

टीव्ही ९ मराठी
महायुती -१९० ते २००
(भाजप-९५ ते १०५, शिवसेना -९५ ते १००)
महाआघाडी – ६५ ते ७५
(काँग्रेस -४० ते ५०, राष्ट्रवादी -२५ ते ३५)
इतर -१६

न्यूज १८ – IPSOS
महायुती – २४३ (भाजप १४१ + शिवसेना १०२)
महाआघाडी – ३९ (काँग्रेस १७ + राष्ट्रवादी २२)

एकूण विधानसभेच्या जागा ः २८८
बहुमतासाठी आवश्यक जागा ः १४५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -