घरदेश-विदेशमहाशिवआघाडीसाठी सोनिया गांधी तयार; पण सेनेकडून हवं लेखी आश्वासन!

महाशिवआघाडीसाठी सोनिया गांधी तयार; पण सेनेकडून हवं लेखी आश्वासन!

Subscribe

बरेच दिवस आढेवेढे घेतल्यानंतर आता अखेर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या ३ आठवड्यांपासून राज्यात सुरु असलेलं सत्तास्थापनेचं महानाट्य अखेर शेवटच्या अंकापर्यंत येऊन पोहोचलं आहे. भाजपशी फारकत घेतलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी सोयरीक जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, काँग्रेसकडून त्यासाठी अत्यंत सावध पावलं उचलली जात होती. विचारसरणीच्या तफावतीमुळे काँग्रेसमधून शिवसेनेला राज्यात पाठिंबा देण्याविषयी आक्षेप घेतला जात होता. मात्र, अखेर काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, हा पाठिंबा देतानाच सोनिया गांधींनी काही अटी घातल्या असून त्या शिवसेनेकडून मंजूर करून घेण्याची जबाबदारी त्यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर सोपवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या प्रकारे शिवसेनेने भाजपकडून लेखी आश्वासन मागितलं होतं, त्याच पद्धतीने आता सोनिया गांधींनी देखील त्यांच्या अटी शिवसेनेला मान्य असल्याच्या लेखी आश्वासनाची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काय नेमकी काय भूमिका घेणार? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आता राहुल गांधींचीही तयारी!

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा द्यावा यासाठी काँग्रेसचे राज्यातले नेते सकारात्मक होते. मात्र, काँग्रेस हायकमांड याबाबत साशंक होतं. येत्या काळात देशातल्या इतर राज्यांमधल्या पोटनिवडणुका, झारखंड, दिल्लीतील विधानसभा निवडणुकांना काँग्रेसला सामोरं जायचं असल्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यात काँग्रेसमधला एक मोठा आणि महत्त्वाचा गट अनुत्सुक होता. त्यामध्ये खुद्द माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतच प्रियंका गांधी-वडेरा यांचा देखील समावेश होता. मात्र, राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी अखेर सोनिया गांधींना शिवसेनेसोबतच्या आघाडीसाठी राजी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

काय आहेत सोनिया गांधींच्या अटी?

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना फक्त राज्यातच नसून थेट पंचायत समित्या, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील शिवसेनेसोबत आघाडी आणि सत्तेमध्ये समसमान वाटप हवं आहे. काँग्रेसच्या तळागाळापर्यंत पोहोचलेल्या यंत्रणेला आलेली मरगळ यातून दूर करून पक्षाला नवी उभारी देण्याचा सोनिया गांधींचा प्रयत्न असल्याचा अंदाज बांधला जात आहे. शिवाय या सगळ्या अटी शिवसेनेने मान्य असल्याचं लिखित स्वरूपात द्यावं, असं देखील सोनिया गांधींनी राज्यातल्या काँग्रेस नेतेमंडळींना सांगितलं आहे. त्यामुळे या तहासाठी शिवसेनेला तयार करण्याचं मोठं आव्हान आता राज्यातल्या काँग्रेस नेतृत्वावर आहे.


हेही वाचा – शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, ‘पवारांची भूमिका योग्यच’!

पवारांच्या भूमिकेमुळे शिवसेना बुचकळ्यात?

दरम्यान, शरद पवारांनी दिल्लीत ‘महाशिवआघाडीची कोणतीही चर्चा नाही’, असं म्हणून निर्माण केलेल्या संभ्रमामुळे शिवसेना बुचकळ्यात पडली आहे. त्यामुळेच, आता उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशिवाय थेट काँग्रेस नेतृत्वाशीच चर्चा करणं योग्य ठरेल, असं बोललं जात आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा घेतल्यानंतर आता समान नागरी कायदा, हिंदुत्व अशा कळीच्या मुद्द्यांवर शिवसेनेची नक्की भूमिका काय असणार? हा देखील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची होणारी बैठक आणि येत्या २२ नोव्हेंबरला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसोबत सेना आमदारांची होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -