घरमहाराष्ट्रसत्ताधार्‍यांच्या लाखाच्या मताधिक्याला हुलकावणी!

सत्ताधार्‍यांच्या लाखाच्या मताधिक्याला हुलकावणी!

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा उत्साह विधानसभा निवडणुकीवेळी दिसला नाही आणि लाखाच्या मताधिक्याने बाजी मारून जाण्याच्या सत्ताधार्‍यांच्या आत्मविश्वासाला तडा जाण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा न मिळालेला अपेक्षित प्रतिसाद, जोडसुट्ट्यांचा पर्यटनासाठी केला गेलेला उपयोग, पावसाचे सावट आणि उच्च मध्यमवर्ग तसेच श्रीमंत वर्गातील मतदारांनी मतदान केंद्रांकडे फिरवलेली पाठ यामुळे महायुतीच्या उमेदवारांना लाखाच्या आघाडीने निवडून येण्याची शक्यता आभाळात दाटून आलेल्या मेघांसारखी काळीकुट्ट झाली आहे. याचा परिणाम होऊन मुंबईसह उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईत लाख लाख मतांसह निवडून येण्याच्या टिमक्या मारणार्‍यांच्या गोटात भीतीचे वातावरण आहे.

राज्यभरात सोमवारी एकाच दिवशी २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सकाळच्या पहिल्या सत्रात खूपच अल्प प्रतिसाद मिळाला. ही चिंताजनक स्थिती बघून सगळ्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मतदारांना वृत्तवाहिन्यांवरुन मतदानासाठी आवाहन केले. त्याच वेळी मतदारांना बाहेर काढणारे शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते खडबडून जागे झाले. मतदानासाठी लोकांना चला म्हणून सांगताना या कार्यकर्त्यांची मोठी दमछाक होताना दिसली. शिवाय दुपारचे जेवण घेऊन आणि थोडा आराम करू, असा विचार करणारा रेंगाळलेला मतदार केंद्राकडे दुपारनंतर पुढे सरकला आणि गर्दी दिसू लागली होती.

- Advertisement -

यामुळे सुरुवातीला वेगाने न सरकणारा मतदानाचा टक्का शेवटी कसाबसा ५० टक्क्यांच्या वर गेला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाची सूत्रे देण्यासाठी टॉवरवासियांची, विशेषतः गुजराती-जैन-मारवाडी मतदारांची आणि सुशिक्षित युवा वर्गाची लगबग विधानसभेच्या वेळी सरसकट मतदारसंघात दिसली नाही. लोकसभेच्या आघाडीवरुन काही बड्या उमेदवारांना लाखांची आघाडी खुणावत होती. त्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा आणि भाजपाचा हक्काचा मतदारसंघ समजल्या जाणार्‍या बोरिवली आणि शिवसेनेचा बालेकिला असलेल्या शिवडी मतदारसंघाचा समावेश होता. मात्र मतदार राजाच्या निरुत्साहामुळे ही नेतेमंडळी लाखाच्या आघाडीचे मनसबदार होणे प्रश्नचिन्हांकित झाले आहे.

शहरी मतदाराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क मोठ्या उत्साहाने बजावला. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे या भागातील मतदारांवर महायुतीची मोठी भिस्त होती. पण इथली घसरलेली मतांची टक्केवारी सत्ताधार्‍यांना डोकेदुखी ठरु शकते. त्याचवेळी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पारंपरिक मतदार आपापल्या उमेदवारांसाठी ठामपणे उभे राहिलेले दिसले. त्यात मलबार हिल, वरळी, शिवडी, विलेपार्ले, बोरिवली, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, ऐरोली आणि अणुशक्ती नगर या मतदारसंघांचा समावेश होता.

- Advertisement -

वरळीचा उच्चभ्रू परिसर, नेपियन्सी रोड, कफ परेड, जुहू, वर्सोवा, ओशिवरा आणि घोडबंदर परिसरातील मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीत जे प्रेम मोदींवर व्यक्त केले होते ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर करताना हात आखडता घेतला. तर विरोधकांची उडालेली दैना आणि त्यामुळे सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांना आलेल्या शैथिल्यानेही मतदानाची टक्केवारी रोडावली. परिणामी शहरी भागातील मतदारसंघासह ग्रामीण भागातील काही निकाल आश्चर्याचे धक्के देऊ शकतील, अशी स्थिती आहे.

याबाबत बोलताना ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती म्हणाले, आमचा मतदार आमच्याशी बांधिलकी राखून राहिला आहे. रांगा बघून निघून जाणे, आमच्या मतदाराचा स्वभाव नाही. आम्ही सेनेचे कार्यकर्ते तसे करुही देत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची आघाडी राज्यात लक्षणीय असेल. तर वरळीचे नगरसेवक अरविंद भोसले म्हणाले, मोदींसाठी तासनतास उभा राहणार टॉवरमधील मतदार विधानसभेसाठी थांबायला तयार नाही. पूर्व उपनगरातील राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणाले, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते दोघेही निराशेने पछाडलेले आहेत. त्यांनी आमच्या मोठ्या साहेबांना बघून तरी बाहेर पडायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही.त्यामुळेच महायुतीचे फावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -