राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना वापरलेल्या ‘त्या’ शब्दांवर अमित शहांची नापसंती

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात लेटर बॉम्बवरुन झालेला गदारोळ संपुर्ण देशाने पाहिला. मंदिर खुले करावेत, या मागणीसाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर चांगलाच वादग्रस्त ठरला होता. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री या नात्याने लिहिलेले पत्रही हजरजबाबी वृत्तीचे उदाहरण असल्याचे सांगितले गेले. आता मात्र राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूरावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीच नापसंती व्यक्त केली आहे. न्यूज १८ या वृत्तवाहिनीशी बोलत असताना अमित शाह यांनी राज्यपालांच्या पत्रावर भाष्य केले आहे.

मंदिरे खुली करण्याचा निर्णय घ्या, यासाठी लिहिलेल्या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारले होते की, “तुम्ही कधीपासून सेक्यूलर झालात?” या ओळीवर बरीच टीका झाली. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. घटनेमध्येच सेक्यूलर शब्द असल्यामुळे राज्यपालांनाच घटना मान्य नाही का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यावरच अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अमित शाह म्हणाले की, “मी राज्यपालांचे ते पत्र वाचले आहे. त्यांनी काही शब्द टाळायला हवे होते. ते शब्द टाळले असते, तर बरे झाले असते.”

हे वाचा – पोट भाजपचं दुखतंय पण बाळंतकळा राज्यपालांना; शिवसेनेचा राज्यपालांवर टीकेचा बाण

राज्यपालांचे संपुर्ण पत्र वाचा – 

प्रिय उद्धव ठाकरे

जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशीसंवाद साधताना मिशन बिगिन अंतर्गत पुनश्च: हरि ओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यामंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत. ११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिरांचे लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडं तुम्ही बार, रेस्टॉरन्ट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळेस दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले.

गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचा समावेश होता. तुम्ही कट्टर ‘हिंदुत्ववादी’ आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभ श्रीरामांचे दर्शनही घेतले होते. तसेच आषाढी एकादशमीच्या दिवशी पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती.

मंदिरे बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या सेक्युलर शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो सेक्युलर शब्द तुम्ही स्वीकारला आहे? मी येथे नमूद करु इच्छितो की, दिल्लीत ८ जून रोजी प्रार्थनास्थळे सुरु करम्यात आली आहेत तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात अनेक ठिकाणी मंदिरे सुरु करण्यात आली होती. मंदिरे सुरु झाल्यानंतर तेथे कोविडचा प्रसार झाल्याचे आढळून आलेले नाही. मी विनंती करतो की, कोविड संसर्गाची योग्य ती काळजी घेऊन राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावीत. या पत्रासोबत मंदिरे सुरु करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत मला प्राप्त झालेली तीन प्रेजेंटेशनही जोडत आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पत्र वाचा –

महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.
Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.

आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो.