घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टकेरळमध्ये भाजप खाते उघडणार?

केरळमध्ये भाजप खाते उघडणार?

Subscribe

केरळमध्ये येत्या २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या लोकसभा निवडणुकीत केरळ राज्याला अचानक पूर्वी कधी नव्हते इतके महत्त्व आले आहे. विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे दावेदार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून केरळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमधील वायनाड मतदार संघातून राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष केरळवर लागले आहे. मागील काही महिन्यांत केरळ राज्यात झालेल्या सामाजिक, राजकीय उलथापालथीनंतर केरळच्या निवडणूक बहुचर्चित झाली आहे. शबरीमालाबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि आपल्या श्रद्धास्थानाच्या बचावासाठी केरळच्या जनतेने केलेले आंदोलन यामुळे केरळचे सामाजिक आणि राजकीय जीवन ढवळून निघाले आहे.

अशा परिस्थिती तेथे लोकसभेची निवडणूक होत आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केरळमधील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रन्ट सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे केरळची जनता सरकारवर नाराज आहे. त्याचा फायदा अर्थातच विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि भाजपने घेतला आहे. केरळमध्ये भाजप आपले खाते खोलणार याबाबत तज्ज्ञांचे दुमत नाही. तिरुवनंतपुरम् मतदार संघात भाजपला संधी आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत या मतदार संघातून भाजपचा उमेदवार, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधात २ टक्क्यांपेक्षाही कमी मतांनी पराभूत झाला होता. त्यामुळे यावेळी भाजपने या मतदार संघात आपली ताकद पणाला लावणार हे निश्चित आहे. असे जरी असले तरी केरळमध्ये खरी लढत ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्त्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक्स फ्रन्ट आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक्स फ्रन्ट या दोन आघाड्यांमध्ये आहे. सध्या केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे.

- Advertisement -

त्यांच्याविरोधात जनमत तयार झाले आहे. त्याचा फायदा काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडी होऊ शकतो. त्यातच राहुल गांधी हे केरळमधून निवडणूक लढवत असल्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य निश्चित उंचावणार आहे. दुसर्‍या बाजूला भाजपच्याविरोधात मोर्चा उघडणार्‍या राहुल गांधी यांनी केरळमध्ये येऊन कम्युनिस्ट पक्षाला आव्हान दिले असल्यामुळे डावे बुचकळ्यात पडले आहेत. त्यातून ते लवकरच सावरतील असे वाटत नाही. त्यामुळे केरळमधील निवडणूक ही निश्चितच देशाचे लक्ष वेधून घेणारी होणार यात शंका नाही.

केरळ निवडणुकीत मुख्य प्रचार मुद्दे
१) शबरीमाला मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि त्याविरोधात तयार झालेले जनमत
२) राजकीय हत्या.
३) केरळमध्ये आलेला पूर आणि त्यानंतरची पुनर्वसनाची कामे
४) शेतकरी आत्महत्या आणि शेतीवर ताण

- Advertisement -

केरळमधील मतदार
केरळमध्ये लोकसभेसाठी एकूण २ कोटी ५४ लाख, ८ हजार ७११ मतदार आहेत. त्यात १ कोटी ३१ लाख ११ हजार १८९ मतदार महिला आहेत. तर १ कोटी २९ लाख ७ हजार ४०३ मतदार पुरुष आहे. तर ११९ मतदार हे किन्नर आहेत. केरळमध्ये महिला मतदारांची संख्या पुरूष मतदारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथे महिला मतदार राजकीय उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

२०१४ सालच्या लोकसभेचे बलाबल
केरळमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा आहेत. त्यापैकी २०१४ साली काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक्स फ्रन्टला १२ (काँग्रेस-८, मुस्लिम लीग – २, आरएसपी -१, केरळ काँग्रेस (मणी) -१) जागा मिळाल्या होत्या. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटीक्स फ्रन्टला ८ (सीपीआय (एम) -७, सीपीआय १) जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी केरळमधून ७३.६ टक्के मतदान झाले होते.

केरळमधील मतदार संघ
१-कासारगोड, २ -कन्नूर, ३ – वटकारा, ४ -वायनाड, ५- कोझीकोडा, ६ – मलाप्पुरम्, ७ -पोन्नानी, ८ – पलाक्कड, ९ -अलाथूर, १० -त्रिचूर, ११ – चलाकुडी, १२ -अर्नाकुलम्, १३ – इडुक्की, १४ – कोट्टायम्, १५ – अलाप्पुझा, १६- मवेलिक्कारा, १७ -पथानामथिट्टा, १८ -कोल्लम्, १९ -अट्टीनगल, २०-तिरुवनंतपुरम्

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -