चीन : ‘करोना विषाणू’मुळे ५६ जणांचा मृत्यू

करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे चीनमध्ये रविवारपर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

China
corona virus death toll raises to 56 in china more cities lock down due to virus
करोना विषाणू

करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे चीनमध्ये रविवारपर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूचा जवळपास दोन हजार नागरिकांना संसर्ग झाला असल्याचे चीन सरकारने सांगितले आहे.

करोनाचे ६८८ नवीन रुग्ण

चीनमध्ये करोना व्हायरसची मागील काही दिवसांपासून संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरस सार्स विषाणू इतकाच धोकादायक असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनच्या अहवालानुसार करोनाचे ६८८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर या विषाणूमुळे १५ जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तसेच यामध्ये हुबेई प्रांतात मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून आतापर्यंत चीनमधील एकूण मृतांपैकी ५२ जण हुबेई प्रांतातील आहेत. तर २ जण सेंट्रल हेनन प्रांतातील असून एकजण हेलगजिंग आणि एक हुबेई उत्तर प्रांतातील आहे. शांघाईमध्येही एका व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

पर्यटकांनी चीनचा बेत केला रद्द

चीनमध्ये करोना व्हायरसची लागण झाल्यामुळे अनेक पर्यटकांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. तसेच करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील १३ शहरांमध्ये प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. तर चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील २० प्रांत विभागांमध्ये आतापर्यंत करोना विषाणूच्या संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, चीनमधील हा व्हायरस जगभरात पसरू लागला असून अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियात करोनाचे संशयीत रुग्ण आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – ‘करोना’मुळे नगरसेवकांची चायना संधी हुकणार; अभ्यास दौरा रद्द करण्याची शक्यता