घरदेश-विदेशपाककडून सीमेवर अतिरिक्त सैन्य, लष्करी सामुग्री तैनात

पाककडून सीमेवर अतिरिक्त सैन्य, लष्करी सामुग्री तैनात

Subscribe

सध्या भारत-पाकिस्तानदरम्यान प्रचंड तणाव असताना पाकिस्तानने आपले अतिरिक्त सैन्य आणि लष्करी सामुग्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेलगत तैनात केली आहे. हे सैन्य अफगाणिस्तान सीमेवरून पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणण्यात आले आहे.

भारतीय लष्कराने बुधवारी पाकिस्तानला गंभीर इशारा देताना, नियंत्रण रेषेलगतच्या नागरी वस्त्यांवरील गोळाबारी तातडीने थांबवण्यास सांगितले आहे. तसे दु:साहस केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही भारताने म्हटले आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सध्या नियंत्रण रेषेलगतच्या नौशेरा भागातील नागरी वस्त्यांवर गोळाबारी होत आहे. १५५ मिमी तोफांमधून पाकिस्तान गोळाबारी करत आहे. त्याला भारतीय लष्कराकडून बोफोर्स तोफांच्या माध्यमातून उत्तर देण्यात येत आहे.

- Advertisement -

दोन्ही देशांच्या लष्कराचे अधिकारी हॉटलाईनवरून मंगळवारी एकमेकांशी बोलले. त्यावेळी नियंत्रण रेषेलगतच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य न करण्याचे भारताकडून सांगण्यात आले. या इशार्‍यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून नागरी वस्त्यांवर होणारी गोळाबारी थांबली आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेलगतची परिस्थिती सध्या शांत आहे, असे लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पाकिस्तानने कृष्णा घाटी, सुंदरबनी येथील भारतीय लष्कराच्या चौक्या आणि नागरी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात तोफा डागल्या. तसेच सातत्याने गोळीबारही केला. त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. पाकच्या गोळाबारीत भारताची कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -