साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारी विरोधात याचिका

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या उमेदवारी विरोधात मालेगावा बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Bhopal
MALEGAON BLAST CASE: PRAGYA SINGH THAKUR
साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (संग्रहित छायाचित्र)

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून दिली आहे. मात्र या उमेदवारी विरोधात मालेगावा बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांने साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काय आहे या याचिकेत

नासिर बिलाल यांनी ही याचिका दाखल केली असून एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवताना साध्वी प्रज्ञा यांनी प्रकृती खराब असल्याचे कारण दिले होते. साध्वी यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांने केली आहे.

कोणाविरोधात साध्वी निवडणूक लढवणार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. बुधवारी, सकाळी साध्वी प्रज्ञाने भाजपच्या भोपाळ येथील कार्यालयात जावून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीनंतर भाजप साध्वी प्रज्ञाला भोपाळ मतदारसंघासाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भोपाळमध्ये १२ मे होणार मतदान

भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. भोपाळ मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आलोक सांजर यांना ७.१४ लाख मते मिळाली होती. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी आहेत.

कोण आहे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर?

२००८ साली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकुर चर्चेत आल्या होत्या. याप्रकरणी त्या नऊ वर्षांपासून तुरुंगात होत्या. सध्या जामीनावर त्यांची सुटका झाली आहे. साध्वी यांच्याकडे भाषणाचे चांगले कौशल्य आहे. २००७ साली आरएसएस प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्याकांड प्रकरणी त्यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, कोर्टात त्यांची निर्दोष सुटका झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here