Live Update: गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण

Live Update News

मुंबईत आढळले २,२२७ नवे रुग्ण

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार २२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४३ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६० हजार ७४४ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत ८३९ रुग्ण बरे झाले असून एकूण १ लाख २६ हजार ७४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.


एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होण्याच्या भितीने पोलीस निरीक्षकाच्या दालनातून बाहेर निघताच जंतूनाशक औषध प्राशन करुन या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बुधावारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या तरुणाला देवकर आयुर्वेद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा धोका टळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


राज्यात १३,९०६ रुग्णांना डिस्चार्ज; ३२५ बाधितांचा मृत्यू

देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २३,८१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ३२५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ९,६७,३४९ वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १३,९०६ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६,८६,४२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,५२,७३४ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.


भारतीय लष्करावर दडपण आणण्याचा चीनींचा प्रयत्न

पूर्व लडाखच्या लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) वर तणावाच्या वातावरणात चीन मानसिकरित्या भारतीय लष्करावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय सेनेचे मनोबल खच्ची करण्यासाठी चीनच्या सैनिकांनी तिबेट्या परिसरात गोळीबार करण्याचा सराव सुरू केला आहे. चीनच्या सैनिकांनी एलएसी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात फायरिंग करण्यास सुरूवात केली असून ते गोळीबारीचा सराव करत असल्याचे सांगितले जात आहे. परंतू लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत एलएसीच्या अनेक ठिकाणांवर त्याचा आवाज घुमत आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असे म्हटले जात आहे.


अभ्यास अपूर्ण राहिल या भीतीने बहिणीची आत्महत्या

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनलॉक-४ची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय देखील काही प्रमाणात सुरु करण्यात आले आहेत. मात्र, या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता मात्र, शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु, ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देखील दिले जात आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक अडथळे येत आहेत. याच अडथळ्यांच्या परिणामांना घाबरुन बारावीत शिकणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.


गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण

देशासह राज्यात कोरोनाचा सातत्याने वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. या कोरोनाच्या संसर्गाचा सामना आता कोरोना योद्ध्यांना देखील करावा लागत आहे. कारण या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५३३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसानंतर पोलिसांना होणाऱ्या बाधितांमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे समो आले आहे.


महापालिकेचे कंगनाकडे लक्ष, हाडे मोडणार्‍या खड्ड्यांकडे दुर्लक्ष!

कोरोनाशी दोन हात करत गेल्या सहा महिन्यापासून बेस्टच्या बसेस मुंबईकरांची वाहतूक सेवा करत आहेत. मात्र मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे बेस्ट बसेसचा प्रवास मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत आहे. तसेच बेस्टच्या बसेसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट कर्मचार्‍यांना स्वत:च रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याचे काम करावे लागत आहे. मात्र याकडे लक्ष न देता मुंबई महानगरपालिका अभिनेत्री कंगना रानौतकडे लक्ष देण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे, असा टोला बेस्ट समितीचे वरिष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी दैनिक ‘आपलं महानर’शी बोलताना मुंबई महानगर पालिकाला लागवला आहे.


१९ वर्षाच्या मुलाला घरातून बोलावले; चाकू भोसकून केली हत्या

दिल्लीतील वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत अमन नावाच्या १९ वर्षाच्या मुलाला चाकू भोसकून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. या भागात अवघ्या एका आठवड्यात चाकूने दुसरा खून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


लॉकडाऊनमुळे शिर्डी साईबाबा मंदिराचे उत्पन्न कमी पण ऑनलाइन देणगीत वाढ

जागतिक महामारी कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडॉऊनचा प्रसिद्ध शिर्डी साई बाबा मंदिराच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अहमदनगरमधील या प्रसिद्ध मंदिराच्या कमाईवर नकारात्मक परिणाम झाला आहे. परंतु ऑनलाइन माध्यमातून मंदिरात येणाऱ्या देणगीत वाढ झाली आहे. कोविड -१९ च्या निर्बंधामुळे हे मंदिर भाविकांसाठी १७ मार्चपासून बंद करण्यात आले आहे.


ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या त्यांच्यावर मुलुंड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाजवळ अंगावर वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. सचिन कुवारा(27) आणि अतुल गोवारी(18) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असून दोघेही बेडगाव येथील रहिवाशी होते. रविवारी वाडा आणि डहाणू तालुक्यात वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. तर सहा जण जखमी झाले होते.


‘आरक्षणाला एकही नामांकित वकील नाही. तसेच सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. महत्त्वाचे मुद्दे अधिवेशनात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे दोन दिवसीय अधिवेशन पटलेल नाही. त्यामुळे हे अधिवेशन घेतल नसत तरी चालेल असते. त्यामुळे पुढील अधिवेशन घेण्याची वेळ आलीच तर अडीच तासाचे अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या’, असे म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.


अर्णब गोस्वामीनंतर कंगनानेही मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असून ‘वेळ आल्यावर उद्धव ठाकरे तुझं गर्वहरण होईल’,असे देखील ती म्हणाली आहे.


मुंबई विमानतळावरुन कंगना रणावत थेट आपल्या घरी पोहोचली आहे. तिच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.


कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली  आहे. सुनावणीला सुरूवात झाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

 


कंगनाच्या ऑफिसमध्ये जे अनधिकृत बांधकाम केले गेले आहे त्यासाठी बीएमसीकडून कारवाई, तोड कारवाईसाठी गाडी आली, हातोडी आणि बाकी सामान घेऊन आले कर्मचारी, आज अनधिकृत बांधकाम तोडले जाणार आहे.


मंगळवारी ७५  हजार कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आज पुन्हा ८९ हजार ७०६  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


 


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने मुंबई पोलीस आणि मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वक्तव्यानंतर तिच्या विरोधात टिकेची झोड उठली आहे. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना असा कलगीतुरा चांगलाच रंगला, जो अजुनही थांबलेला नाही. आजच्या सामनाच्या ‘बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान’ या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. ‘मुंबाई’ मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे.


इयत्ता ९ ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छेने शिक्षकांच्या मार्गदर्शनखाली शाळेत जाता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाकडून गाईल्डलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. २१ सप्टेंबर पासून इयत्ता ९ ते १२ वी वर्गसाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली आहे.