बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

१४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्या प्रकरणी न्यायालयाने ठोठावली फाशीची शिक्षा. बलात्कार करून मुलीला जिवंत जाळले होते.

Bhopal
death penalty
प्रातिनिधिक फोटो

देशात बलात्काराच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी न्यायालयाने कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षेची भिती वाटून त्यांनी गुन्हा करण्यापूर्वी विचार करतील त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचा निघृण खून केल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. मध्यप्रदेश येथील सागर जिल्ह्यातील ही घटना आहे. यावर्षी बलात्काराच्या खटाल्यांमध्ये ११ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सरकारी अधिवक्ता एमडी अवस्थी हे सरकारच्या वतीने हा खटला लढवत होते. राबु उर्फ सर्वेश सेन (२२) असे या आरोपीचे नाव आहे. ७ डिसेंबर २०१७ रोजी त्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला.

या घटनेनंतर पोलिसांनी राबु याला अटक केली. त्याविरोधात बलात्कार, पॉक्सो आणि खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यामुलाने अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर जाळून मारुन टाकल्यामुळे न्यायालयाने ही कठोर शिक्षा ठोठावली आहे.”अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली. ही घटना संवेदनशील आणि तितकीच क्रूर असल्यामुळे भंवर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी २१ दिवस या प्रकरणी तपास करुन सर्व पुरावे जमा केले. पुराव्याच्या आधारावर न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यात यश मिळाले.” अशी प्रतिक्रिया फिर्यादी वकील राजेंद्र कुमार यांनी दिली. या खटल्यात सेन याला दोषी घोषीत केल्यानंतर न्यायाधीश अशोक मिश्रा यांनी फाशीचा निर्णय दिला.

मध्यप्रदेशात बलात्काराच्या घटना वाढल्यामुळे हे गुन्हे थांबवण्याचे राज्य सरकार प्रयत्न करत आहे. स्वातंत्रदिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणातही महिला सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. या अंतर्गत देशात आता बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरुन जनतेत आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे पीडितांच्या कुटुंबीयांकडून कौतूक केले जात आहे.