‘९ नोव्हेंबरलाच बर्लिनची भिंत पडली होती’, अयोध्या निकालावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या निकालानंतर देशाला संबोधित करताना इथून पुढे एक होऊन वाटचाल करण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे.

New Delhi
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या नागरिकांना उद्देशून अभिभाषण केलं. यामध्ये त्यांनी न्यायपालिकेचं महत्त्व अधोरेखित करतानाच सर्वोच्च न्यायालयाचं कौतुक केलं. त्यासोबतच त्यांनी भारतीयांनी या संयमाने हा निर्णय स्वीकारला, त्याबद्दल देखील भारतीय जनतेचं कौतुक केलं आहे. ‘आजच्याच दिवशी बर्लिनची भिंत देखील पडली होती. दोन समाजघटकांमधली भिंत पडून एकत्र येण्याचा हा दिवस आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले. अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असून मुस्लीम पक्षकारांना अयोध्येमध्येच दुसऱ्या मोक्याच्या ठिकाणी मशीद उभारणीसाठी ५ एकर जागा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

‘कित्येक वर्षांची प्रक्रिया आज संपली’

‘सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल सुनावलेल्या या प्रकरणाला शेकडो वर्षांचा दीर्घकालीन इतिहास आहे. आज या प्रकरणाचा निर्णय आला आहे. कित्येक वर्ष चाललेली ही प्रक्रिया आज संपली आहे. संपूर्ण जग हे मानतं की भारत जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे. आज जगाला हे देखील कळलं की भारताची लोकशाही किती जिवंत आहे. निर्णय आल्यानंतर ज्या पद्धतीने प्रत्येक समाजघटकाने खुल्या मनाने त्याचा स्वीकार केला, ते भारताच्या पुरातन संस्कृतीला प्रतिबिंबित करतं. विविधतेमध्ये एकतेसाठी भारत ओळखला जातो. आजची घटना इतिहासाच्या पानांमध्ये लिहिली जाईल. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आजचा हा दिवस एक सुवर्णाध्याय ठरला आहे’, असं मोदी म्हणाले.

‘आज कटुतेला तिलांजली देण्याचा दिवस’

‘या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या बाजू ऐकून घेतल्या. निकाल सर्वसंमतीने आला ही देशासाठी आनंदाची बाब आहे. हे काम सोपं नाही. या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेला दृढ निश्चय दिसून आला. त्यामुळेच देशातल्या न्यायपालिकेचं विशेष अभिनंदन. आज ९ नोव्हेंबर आहे. ९ नोव्हेंबरलाच बर्लिनची भिंत पडली होती. अयोध्या निर्णयासोबतच ९ नोव्हेंबर ही तारीख आपल्याला सोबत पुढे जाण्याची शिकवण देखील देते. आजचा संदेश एकत्र येण्याचा आणि एकत्रच आयुष्य व्यतीत करण्याचा आहे. या दरम्यान कुणाच्याही मनात कुठे कटुता आली असेल, तर आज तिला तिलांजली देण्याचा दिवस आहे. नव्या भारतात नकारात्मकतेला कोणतंही स्थान नसेल’, असं त्यांनी यावेळी सांगितलं.


हेही वाचा – Ayodhya Verdict : जागा रामलल्लाचीच, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे मुद्दे!

‘कायद्याच्या चौकटीतच समस्यांचं समाधान’

‘कितीही कठीण समस्या असेल, तर तिच्यावर उपाय कायद्याच्या चौकटीतच मिळू शकतो, हे आजच्या निर्णयामुळे सिद्ध झालं. फक्त आपल्याला संयम ठेवणं आवश्यक आहे. आपल्या न्यायपालिकेवर आपला विश्वास कायम राहणं आवश्यक आहे. अयोध्या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला आहे. पण आता नवी पिढी नव्या संकल्पाने नवा भारत घडवण्याच्या कामी लागेल. आता प्रत्येक भारतीयाला आपल्या कर्तव्याला प्राथमिकता देणं आवश्यक झालं आहे’, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.