काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आयसीयूमध्ये

अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाबाधित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती खालावली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गुडगावमधील मेदांता रुग्णालयात अहमद पटेल यांना दाखल करण्यात आले उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने आयसीयूत ठेवण्यात आले असल्याची माहिती कुटुंबाने दिली आहे.

७१ वर्षीय अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबर रोजी आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, प्रकृती खालवल्याने त्यांची रवानगी मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये केल्याची माहिती कुटुंबीयांनी रविवारी दिली.

“अहमद पटेल यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगू इच्छितो, की आमचे वडील काही आठवड्यांपूर्वी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे,” असे ट्विट त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी केले. पुढे त्यांनी “अहमद पटेल यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख सुरु आहे. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा,” असे आवाहन देखील केले आहे.